नाशिकः नाशिकमध्ये अतिशय झपाट्याने वाढणारे कोरोना रुग्ण पाहता प्रशासनाला धडकी भरली आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत जिल्हाधिकारी सभागृहात कोरोना आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी शहरातील रामकुंड, पंचवटी भागात होणाऱ्या गर्दीला आळा घालण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांना दिल्या. सोबतच खुल्या पर्यटनावर बंदी घालण्याचे आदेश दिले. धार्मिक स्थळांबाबतही लवकर निर्णय घेऊ, असे संकेतही त्यांनी दिले आहेत.
अधिकाऱ्यांसोबत मंथन
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ऑनलाईन कोरोना आढावा बैठकीला पालकमंत्री भुजबळ यांच्यासह जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, अपर जिल्हाधिकारी भीमराज दराडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, उपजिल्हाधिकारी नितिन मुंडावरे, ज्योती कावरे, निलेश श्रींगी यांच्यासह संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
का होतेय गर्दी?
नाशिक पर्यटनासाठी तर प्रसिद्ध आहेच. सोबत अनेक धार्मिक विधीसाठी देशभरातील नागरिक नाशिक गाठतात. रामकुंड आणि गोदातीरावरील परिसरात त्यांची गर्दी होते. नदीकाठावर विविध धार्मिक विधी सुरू असतात. मात्र, कोरोनाचे झपाट्याने वाढणारे रुग्ण पाहता खुल्या पर्यटनावर तर बंदी घालण्याचे आदेश दिलेच आहेत. सोबतच आता या विधींना किती लोकांनी उपस्थित रहावे, याची मर्यादा निश्चित केली जाणार असल्याचे समजते. शहरातील सर्व पर्यटन स्थळांवरील गर्दी तातडीने कमी व्हावी, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांना दिल्या आहेत.
मार्गदर्शक सूचना पाळा
पालकमंत्री भुजबळ म्हणाले, तिसऱ्या लाटेतील लक्षणे सौम्य असल्याने विलगीकरणाचा कालावधी देखील कमी झालेला आहे. वाढणारी रुग्णसंख्या चिंताजनक असली तरी राज्यपातळीवर नाशिक जिल्ह्यात उपाययोजनांच्या अनुषंगाने यंत्रणांमार्फत चांगली कामगिरी होत आहे. त्याचप्रमाणे खुल्या जागेतील पर्यटन व धार्मिक स्थळांवर गर्दी होणार नाही व कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी पोलीस यंत्रणा व महानगरपालिका यांनी नियोजन करावे. तसेच कोरोना कालावधीत राज्य शासनामार्फत येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांची सर्व यंत्रणांनी व्यवस्थितरीत्या अंमलबजावणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
Nashik Oxygen|राज्यातला सर्वात मोठा ऑक्सिजन प्लांट नाशिकमध्ये; उत्तर महाराष्ट्राचीही चिंता मिटली