नाशिकः सध्या जगभरात डेल्टासोबतच ओमिक्रॉन (Omicron) या कोरोनाच्या नव्या विषाणूचे रुग्ण वारुळ फुटल्यानंतर मुंग्या बाहेर पडाव्यात त्याप्रमाणे असंख्य सापडत आहेत. त्यामुळेच सरकारने कोरोना (Corona) लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले. अनेक ठिकाणी प्रवेशासाठी दोन्ही लसीचे डोस झाल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले. शिवाय ज्येष्ठ नागरिक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी बूस्टर डोसही सुरू करण्यात आला. या संधीचा फायदा सध्या सायबर हॅकर्स घेत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सावध व्हावे आणि फसवणूक टाळावी, असे आवाहन नाशिकचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले आहे.
कशी होतेय फसवणूक?
नाशिकचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील म्हणाले की, अनेक नागरिकांना बूस्टर डोससाठी फसवे कॉल येत आहेत. त्यांच्याकडून मोबाईलवर लिंक पाठवून माहिती भरून घेतली जात आहे. ही माहिती भरल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी क्रमांक येतो. हा ओटीपी क्रमांक तुमच्याशी बोलणारी व्यक्ती मागून घेते. त्यानंतर खात्यातील पैसे रिकामे होत आहेत. हे ध्यानात घेता नागरिकांनी अशा कॉलपासून सावध व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
मोबाईल साक्षर व्हा
नागरिकांना बूस्टर डोसच्या नावाखाली कॉल आला तरी सुद्धा ही फसवणूक टाळता येऊ शकते. त्यासाठी फक्त थोडे दक्ष रहावे लागेल. कुठलाही फोन आला आणि समोरच्याने आपली व्यक्तिगत माहिती मागितली, तर ती देऊ नका. कारण कुठल्याही सरकारी योजनेसाठी अशी फोनवरून माहिती मागितली जात नाही. लसीकरणासाठी तर नाहीच नाही. सोबतच नागरिकांनी आपल्या खात्याची, एटीएम क्रमांक, एटीएम कार्डच्या क्रमांकाचीही माहिती कोणालही शेअर करू नये. स्वतःच्या मोबाईलवर आलेली कसलिही लिंक उघडू नये, मोबाईलवरचा ओटीपी कोणाला सांगू नये, अशी थोडी मोबाईल साक्षरता बाळगली, तर नक्कीच कॉल आला तरी फसवणूक टळू शकते.
बूस्टर लसीकरण सुरू
नाशिकमध्ये बूस्टर डोसला द्यायला सुरुवात करण्यात आली आहे. नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोडे यांना पहिला बूस्टर डोस देण्यात आला. जिल्ह्यात सोमवारपासून 45 हजार हेल्थ वर्कर्सना प्रिकॉशन डोस देण्यात येत आहे. त्यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय प्रमाणपत्र दाखवण्याची गरज नाही. फक्त दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमध्ये नऊ महिन्यांचे अंतर बंधनकारक आहे. 10 एप्रिल 2021 पू्र्वी डोस घेतलेले असे 45 हजार हेल्थ वर्कर्स या मोहिमेसाठी पात्र असणार आहेत. दरम्यान, बूस्टर डोस व्यतिरिक्त ज्या लोकांचे पहिले आणि दुसरे डोसा राहिले असतील, त्यांनी तात्काळ घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांनी केले आहे.
Nashik Oxygen|राज्यातला सर्वात मोठा ऑक्सिजन प्लांट नाशिकमध्ये; उत्तर महाराष्ट्राचीही चिंता मिटली