नाशिकः नाशिकमध्ये एकीकडे रोज हजारापेक्षा जास्त रुग्ण सापडत असताना पोलीस आयुक्तांकडून मात्र कोरोना (Corona) प्रतिबंधक नियमांच्या अंमलबजावणीकडे होणारे दुर्लक्ष आणि चालढकलपणामुळे नागरिक संभ्रमात सापडले आहेत. आता खरे नियम कोणते आणि त्याची अंमलबजावणी करायची तरी कशी, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. प्रशासन स्वतः इतके गोंधळलेले असेल, तर नागरिकांचे विचारूच नका. एकीकडे कोणत्याही नियमांचे पालन होत नाही. दुसरीकडे अशा सावळ्या गोंधळामुळे कोरोना प्रतिबंधित नियमांचे वरून कीर्तन आणि आतून तमाशा, असे चित्र नाशिकमध्ये तरी पाहायला मिळत आहे. त्यामुळे हे सारे टाळायचे असेल, तर पोलीस आयुक्तांनी स्वतः दक्ष व्हावे. नियमावली लागू करताना राज्य शासन काय म्हणतेय हे ही पाहावे, असा सूर नागरिकांमधून उमटत आहे.
नेमके प्रकरण काय?
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी डिसेंबर महिन्यात कोरोनाचे नवीन प्रतिबंधित नियम जारी केले. या नियमांची तातडीने नाशिक ग्रामीणमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी अंमलबजावणी सुरू केली. मात्र, नाशिक शहरामध्ये हे नियम लागू करण्यात चालढकलपणा करण्यात आला. अनेक मोठ्या राजकीय नेत्यांची लग्न धूमधडाक्यात पार पडली. त्यानंतर आठ दिवसांनी 28 डिसेंबर रोजी हे नियम लागू करण्यात आले. मात्र, हे नियम लागू होताय नाही, तोपर्यंत राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी नवीन नियम लागू केले. विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी हे नियम आहेत तसे ग्रामीण भागात लागू करण्याचे आदेश दिले.
पोलीस आयुक्तांचे काय?
पोलीस आयुक्तांनी शहरात कलम 144 लागू केले. त्यानुसार दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी असेल. तसेच किल्ले, प्राणीसंग्रहालये, उद्यानेदेखील बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. याव्यतिरिक्त खासगी कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थितीस मनाई करण्यात आली आहे. त्यासाठी कामाचे विभाजन 24 तासात करण्याचे नाशिक प्रशासनाने सांगितले. खासगी कार्यालये 24 तास उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात आली. सोबतच जलतरण तलाव, ब्युटी पार्लर, स्पा सेंटर, वेलनेस सेंटर पुढील बंद ठेवण्याचा आदेश देण्यात. मात्र, राज्याचे मुख्य सचिव सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी वाढत्या विरोधामुळे जिम आणि ब्युटी सलून 50 टक्के उपस्थितीनुसार सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते. याचा पोलीस आयुक्तांना विसर पडला.
पुन्हा नियमांत बदल
पोलीस आयुक्तांनी या नियमांमध्ये पुन्हा बदल केला असून, आता जिम आणि ब्युटी सलून 50 टक्के उपस्थितीनुसार सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या गोंधळात होतेय काय, तर शहरामध्ये नेमके कोणते नियम लागू आहेत, हेच नागरिकांना धड समजत नाही. त्यामुळे ज्यांना नियम पालन करायचे आहे, त्यांनी करावे काय, असा सवाल उपस्थित होत आहे. याचे उत्तर प्रशासनाकडे असल्याचे सध्या तरी दिसत नाही. त्यामुळे वाढत्या कोरोना रुग्णांसोबत संभ्रमही वाढला आहे.
यावर उपाय काय?
कोरोना प्रतिबंधक नियमांचा खेळखंडोबा टाळायचा असेल, तर उपाय काय, हा प्रश्न निर्माण होतो. त्यावर एकच साधे उत्तर आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे ज्याप्रमाणे राज्य सरकारने नियम लागू केल्या केल्या तात्काळ नियम लागू करतात, तितक्या तातडीने पोलीस आयुक्तांनीही हे नियम लागू करण्याची अंमलबजावणी केली पाहिजे. अन्यथा होते काय, की पोलीस आयुक्त दोन-चार उशिरांनी शहरात हे नियम लागू करण्याचे आदेश देतात. तोपर्यंत नवे नियम येऊन धडकतात. त्यामुळे गोंधळ वाढतो. हे टाळता येऊ शकते. त्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालयाने दक्ष रहावे म्हणजे झाले.
Nashik Oxygen|राज्यातला सर्वात मोठा ऑक्सिजन प्लांट नाशिकमध्ये; उत्तर महाराष्ट्राचीही चिंता मिटली