नाशिकः नाशिकमध्ये रोज हजाराच्या पुढे कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. मात्र, यात कोरोना चाचणी केल्यानंतर रुग्णांना तब्बल चार-चार दिवस रिपोर्ट मिळत नाहीत. त्यामुळे उपचाराविना ताटकळत रहावे लागत असून, त्यांना रिपोर्ट घेण्यासाठीच कित्येक फेऱ्या माराव्या लागत आहेत. यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. जिल्हा प्रशासन आम्ही सारी तयारी केले असे म्हणते, मग गेल्या दोन लाटेच्या अनुभवातून आपण नेमकी कशाची तयारी केली, असा सवाल संतप्त रुग्ण विचारत आहेत.
अशी आहेत उदाहरणे…
जिल्हा रुग्णालयात अनेकांनी 11 जानेवारी रोजी कोरोना चाचणीसाठी स्वॅब दिला. त्यांना उद्या अहवाल येईल असे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात 4 दिवस अहवाल मिळालाच नाही. आपला रिपोर्ट मिळावा म्हणून संबंधित रुग्ण रोज जिल्हा रुग्णालयाचे उंबरे झिजवत होता. असे अनेकांबाबत घडत आहे. असे रुग्ण पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह निघाले, तर संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे रुग्णांना नेमके उपचार कोणते घ्यायचे, याचाही संभ्रम आहे. त्यामुळे लवकरात लवकर कोरोना रिपोर्ट मिळावेत, अशी मागणी होत आहे.
ऑपरेटर नसल्याने अडचण
जिल्हा रुग्णालयात डेटा ऑपरेटनरची अडचण असल्यामुळे रुग्णांचे रिपोर्ट मिळत नसल्याचे समजते. मात्र, आता ऑपरेटरची अडचण दूर झाली आहे. त्यामुळे रुग्णांना वेळेत रिपोर्ट मिळतील असे सांगण्यात आले आहे. त्यानंतरी अनेकांना रिपोर्ट मिळाले नव्हते. जिल्हा रुग्णालयात हजारो रुग्णांनी कोरोना चाचणीसाठी स्वॅब दिले आहेत. विशेष म्हणजे हे रुग्ण शहरभर तसेच फिरत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात अजून कोरोनाचे रुग्ण कितीतरी पटीने वाढण्याची भीती ‘लोकमत’ने दिलेल्या रिपोर्टमध्ये व्यक्त करण्यात आली आहे.
5 हजार 366 अर्जांची छाननी
कोरानामुळे मयत झालेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांनी आतापर्यंत 12 हजार 447 ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत. त्यापैकी 5 हजार 366 अर्जांची छाननी करून ते मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत. उर्वरित अर्जांची छाननीची प्रक्रिया सुरू आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात 483 मेट्रीक टन ऑक्सिजन साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. जिल्ह्यातील वाढणारा पॉझेटिव्हीटीचा दर पाहता तपासणीचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले आहे.
Nashik Oxygen|राज्यातला सर्वात मोठा ऑक्सिजन प्लांट नाशिकमध्ये; उत्तर महाराष्ट्राचीही चिंता मिटली