राज्यातील राजकारणात नाती आणि नात्यांच्या लढती नेहमी चर्चेत असतात. दोन वेगवेगळ्या पक्षात असणाऱ्या नात्यांची लढतीची चर्चा होत असते. बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांची लढत लक्षवेधी ठरली. नणंद-भावजयच्या या लढतीकडे देशाचे लक्ष होते. तसाच राजकीय संघर्ष नाशिक जिल्ह्यात आहे. या ठिकाणी दिर-भावजय यांच्यात वर्चस्वाचा संघर्ष होता. भाजप आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीत हा संघर्ष होता. अखेर हा संघर्ष आता मिटल्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष संपुष्टात येण्याची शक्यता आहे. खासदार भारती पवार यांनीआमदार नितीन पवार यांची भेट घेतली आहे.
कळवण मतदार संघाचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार नितीन पवार आणि भाजप खासदार अन् दिंडोर लोकसभेच्या उमेदवार भारती पवार हे सख्ख्ये दीर-भावजय आहेत. भारती पवार आणि नितीन पवार यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहेत. मतदार संघात वर्चस्वावरुन हा संघर्ष असतो. परंतु आता दिंडोरीच्या उमेदवार भारती पवार कळवणचे आमदार नितीन पवार यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर भारती पवार नितीन पवार भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
नितीन पवार आणि भारती पवार यांच्यातील वैर संपुष्टात आल्यास राजकीय संघर्ष बदलणार आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात या वादाचे सकारात्मक परिणाम भारती पवार यांच्या बाजूने होणार आहे. यामुळे २० मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत भारती पवार यांना फायदा होण्याची शक्यता आहे.
भारती पवार नितीन पवार यांच्या घरी गेल्यानंतर आमच्यात मतभेद होते. मनभेद नाही, असे म्हटले आहे. ते मोठे आहेत, माझ्याकडून कळत न कळत काही चुकले असले तरी मी माफी मागेल. नितीन पवार म्हणाले, आमचे राजकीय मतभेद होते. पण कुटुंब म्हणून आम्ही एकत्रच होतो.
दिंडोरी लोकसभा मतदार संघात महायुतीकडून भारती पवार तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून भास्कर भगरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. या ठिकाणी माकपचे माजी आमदार जे. पी. गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर त्यांना अर्ज मागे घेत महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे.