शहरवासीयांनो पाण्यासाठी ही कसरत पाहा, निसरड्या वाटेवरुन लहान मुलांसोबत दोन किमी पायपीट, शेवटी मिळते हंडाभर गढूळ पाणी

| Updated on: Apr 12, 2024 | 8:18 AM

water crisis in nashik : धरणामधून महामार्गावर असलेल्या अनेक पंचतारांकित हॉटेल व रिसॉर्ट यांना २४ तास पाणी पुरवठा केला जातो. या वाड्या गेल्या ३० वर्षापासून नगरपरिषद हद्दीत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. मात्र अद्याप ही नळ कनेक्शन जोडण्यात आलेले नाहीत.

शहरवासीयांनो पाण्यासाठी ही कसरत पाहा, निसरड्या वाटेवरुन लहान मुलांसोबत दोन किमी पायपीट, शेवटी मिळते हंडाभर गढूळ पाणी
पाण्यासाठी होणारी पायपीट
Follow us on

पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या इगतपुरीत एप्रिल महिन्यातच भीषण पाणी टंचाई सुरु झाली आहे. या भागातील आदिवासी नागरिकांना आतापासून पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहेत. एका हंडाभर पाण्यासाठी दोन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. त्यानंतर गढळू पाणी मिळत आहे. इगतपूर तालुक्यात पावसाळ्यात सुमारे चार हजार मिमी पाऊस पडत आहे. त्यानंतरही पाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे पाणी टंचाईच्या झळा आतापासूनच सुरु झाल्या आहेत.

नगरपरिषद हद्दीत पाणी टंचाई

भावली धरणातून १६ कोटी रुपये खर्च करुन इगतपुरी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याची पाईपलाईन घेतली आहे. मात्र तरीही इगतपुरी शहरात गेल्या पाच वर्षांपासून आठवड्यातून फक्त तीन दिवस पाणी पुरवठा केला जात आहे. तर इगतपुरी नगरपरिषद हद्दीतील तळेगाव शिवारातील कातुरवाडी, वाघाचा झाप, मेंगाळ झाप या वस्तीमधील दोनशे ते अडीचशे लोकसंख्या वस्ती असलेल्या आदिवासी नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

हे सुद्धा वाचा

अंदाज चुकला तर अपघात

इगतपुरी नगरपरिषदेच्या हद्दीत असणाऱ्या वाडीच्या नागरिकांना थेट दोन किमी लांब असलेल्या घाटनदेवी मंदिर समोरील खोल उंट दरीतील झऱ्यातील गढूळ पाणी पिण्यासाठी आणावे लागत आहे. या वाडीपासून हा झरा जवळपास दोन किलोमीटर आहे. या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नाही. निसरडी वाट असलेल्या थेट खोल असलेल्या डोंगर दऱ्यातून एका हाताने आपल्या लहान लेकराला धरत दुसऱ्या हाताने डोक्यावरील हंडा सांभाळत हे पाणी आणावे लागत आहे. थोडाही अंदाज चुकला तर थेट दरीत कोसळण्याची शक्यता आहे.

पाण्यासाठी होणारी पायपीट

पाईपलाईन झाली पण पाणी कुठे

मागील वर्षी येथील आदिवासी नागरिकांनी आंदोलन केल्यानंतर नगरपरिषदेने फक्त पाईपलाईन केली. मात्र वर्ष उलटुन गेले तरीही या पाईपलाईनला पाणी आलेच नाही. या ठिकाणी हाकेच्या अंतरावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा तळेगाव डॅम आहे. या डॅममधून महामार्गावर असलेल्या अनेक पंचतारांकित हॉटेल व रिसॉर्ट यांना २४ तास पाणी पुरवठा केला जातो. या वाड्या गेल्या ३० वर्षापासून नगरपरिषद हद्दीत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. मात्र अद्याप ही नळ कनेक्शन जोडण्यात आलेले नाहीत. प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीवेळी लोक प्रतिनिधी व नगरसेवक मत मागताना तुमच्या समस्या सोडवू, असे आश्वासन देतात. मात्र आजपर्यंत कोणीही आश्वासनाची पुर्तता केली नाही.

पाण्यासाठी होणारी पायपीट