मनोज कुलकर्णी, नाशिकः अखेर येत्या फेब्रुवारी महिन्यात होणारी नाशिक (Nashik) महापालिका निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार घेण्याच्या निर्णयावर बुधवारी (22) शिक्कामोर्तब झाले. मात्र, पालिका निवडणूक द्विसदस्यीय पद्धतीने घ्या, अशी मागणी करणाऱ्या शिवसेना(Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि कॉंग्रेसची या निर्णयाने गोची होण्याचीच शक्यता जास्त आहे. (Nashik Municipal Election according to three member ward structure, Challenge to Shiv Sena, NCP and Congress)
नाशिकमध्ये यापूर्वी फेब्रुवारी 2017 मध्ये महापालिका निवडणुका झाल्या. त्यावेळी 29 प्रभाग 4 सदस्यांचे आणि 2 प्रभाग 3 सदस्यीय होते. या बहुसदस्यीय प्रभाव पद्धतीचा भाजपला पुरेपुर फायदा झाला. त्यांनी महापालिकेत निर्विवाद सत्ता काबीज केली. महापालिकेच्या एकूण 122 जागांपैकी 67 जागा भाजपने खिशात घातल्या. त्यानंतर शिवसेनेने 34 जागा मिळवत दुसरे स्थान पटकावले. काँग्रेस 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही अवघ्या 6 जागांवर समाधान मानावे लागले, तर कधीकाळी 39 जागा मिळवून सत्तेत असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पानिपत होऊन त्यांना फक्त 5 जागा मिळाल्या. भाजपच्या या विजयश्रीची विरोधकांनी धास्ती घेतली होती. त्यामुळेच नाशिकमध्ये शिवसेना आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसने बहुसदस्यीय ऐवजी द्विसदस्यीय प्रभाग रचनेची मागणी केली होती. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना तसे साकडे घातले होते. तर राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष अनिता भामेरे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, पालकमंत्र्यांना द्विसदस्यीय प्रभाग रचना करावी, असे पत्र लिहिले होते. काँग्रेसने सुरुवातीला एक प्रभाग, एक सदस्य अशी मागणी लावून धरली होती. संपर्कमंत्री बाळासाहेब थोरात यांना काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर यांनी तसे कळवले होते. मात्र, पुढे त्यांनीही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरात सूर मिसळून द्विसदस्यीय प्रभाग रचनेची मागणी केली. भाजपने शेवटपर्यंत बहुसदस्यीय प्रभाग पद्धती रहावी, अशी मागणी लावून धरली होती. अपक्षांचे महत्त्व कमी व्हावे, राजकीय ब्लॅकमेलिंग टळावे यासाठी बहुसदस्यीय पद्धत अंमलात आणली. आता राज्यातल्या सत्ताधाऱ्यांनी कोणतीही प्रभाग पद्धत अवलंबली तरी आम्ही लढू, अशी तयारी नाशिक भाजपचे शहराध्यक्ष गिरील पालवे यांनी बोलून दाखवली होती. एकंदर या साऱ्या पार्श्वभूमीवर आता नाशिकमध्ये तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार महापालिका निवडणूक होणार आहे. हे पाहता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची एकप्रकारे गोची आणि भाजपची वाट त्यातल्या त्यात सुकर झाल्याचे दिसते आहे. या रचनेतही भाजपच्या अपक्षेनुसार तसेही एका प्रभागात तीन सदस्य राहणार आहेत, म्हणजेच सदस्यांची संख्या जास्तच राहणार आहे. त्याचा फायदा त्यांना नक्कीच होण्याची शक्यता आहे. एकवेळेस या निवडणुकीत शिवसेना वातावरण निर्मिती करून बाजी मारेल, पण दोन्ही काँग्रेस आणि मनसेचे काय होणार, असा प्रश्न आहे.
महापालिकेतील सध्याचे पक्षीय बलाबल
भाजप 67
शिवसेना 34
काँग्रेस 6
राष्ट्रवादी 6
मनसे 5
इतर 3
सध्याचे प्रभाग
29 प्रभाग 4 सदस्यीय
2 प्रभाग 3 सदस्यीय
अशी राहील नवी प्रभाग रचना
40 प्रभाग 3 सदस्यीय
1 प्रभाग 2 सदस्यीय
(Nashik Municipal Election according to three member ward structure, Challenge to Shiv Sena, NCP and Congress)
इतर बातम्याः
सत्ताधारी भाजपला नाशिकमध्ये घरचा आहेर; रस्ते कामाच्या चौकशीची आमदार फरांदे यांची मागणी
नाशिकमध्ये गोदावरीला दुसऱ्यांदा पूर; रामसेतू पुलाजवळ पाणी, नदीकाठची मंदिरे पाण्याखाली