नाशिकः नाशिक जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील चित्र अखेर स्पष्ट झाले आहे. सध्या 4 नगरपंचायतीच्या 8 जागांसाठी 20 उमेदवार रिंगणात असून, तिघांची बिनविरोध निवड झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 12 जणांनी निवडणुकीला रामराम ठोकत अर्ज मागे घेतला. या जागांचे 18 जानेवारी रोजी मतदान होईल.
हे तिघे बिनविरोध
ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे देवळा येथे 4, निफाड 3, कळवण आणि दिंडोरी येथे प्रत्येक 2 जागांवर अशा एकूण 11 जागांची निवड स्थगित करून येथे सोडत काढून पुन्हा प्रक्रिया घेण्यात आली. या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. दरम्यान कळवण येथील प्रभाग क्रमांक 11 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या हर्षदा पगार, तेजस पगार आणि देवळा येथील प्रभाग क्रमांक 13 मध्ये भाजपचे अशोक आहेर यांची बिनविरोध निवड झाली आहे.
तीन मंत्र्यांनी केला प्रचार
नगरपंचायतींची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची करण्यात आली. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे तीन मंत्री प्रचारासाठी रिंगणात उतरले होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात सुरगाणा येथे तळ ठोकून होते. कृषिमंत्री दादा भुसे यांनी सुरगाणा, पेठ आणि कळवण तालुका पिंजून काढत या भागात त्यांच्या रॅली आणि सभा घेतल्या. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनीही प्रचारासाठी जिल्ह्यात तळ ठोकला होता. तर पालकमंत्री छगन भुजबळांनी विदर्भात प्रचार केला.
87 जागांसाठी मतदान झाले
नाशिक जिल्ह्यातील 6 नगरपंचायतींच्या 87 जागांसाठी मंगळवारी, 21 डिसेंबर रोजी मतदान झाले. त्यासाठी 292 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यातील निफाड, पेठ, सुरगाणा, देवळा, दिंडोरी आणि कळवण या नगरपंचायतींची निवडणूक सध्या सुरू आहे. सुरगाणा आणि पेठ नगरपंचायतीमध्ये ओबीसी आरक्षण नाही. त्यामुळे येथे सर्वच्या सर्व 17 जागांवर निवडणूक होत आहे. निफाड आणि दिंडोरी नगरपंचायतीत 14 जागांवर मतदान झाले. देवळा येथे फक्त 11 जागांवर मतदान झाले. या ठिकाणी 5 जागा ओबीसीसाठी राखीव होत्या. या निवडणुकीत एकूण 4 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यात देवळा येथील दोन आणि दिंडोरी, कळवण नगरपंचायतीतील एकेका उमेदवाराचा समावेश आहे. दिंडोरीत 17 प्रभागांपैकी 15 प्रभागांत 63 उमेदवारांनी 82 अर्ज दाखल केले होते. याठिकाणी 11 उमेदवारांचे 30 अर्ज माघारी घेण्यात आले. त्यामुळे सध्या 52 उमेदवार रिंगणात आहेत. कळवमध्ये 14 प्रभागात 48 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. येथे 9 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे 39 जागांवर सामना रंगणार आहे.
19 जानेवारी रोजी निकाल
पेठ तालुक्यात 17 प्रभागांसाठी 75 जणांनी उमेदवारी दाखल केली होती. येथे दोन अर्ज बाद ठरले, एकाने माघार घेतली. त्यामुळे 72 जणांमध्ये निवडणूक होत आहे. निफडामध्ये चौघांनी माघार घेतली आहे. त्यामुळे सध्या 14 जागांसाठी 43 उमेदवारांमध्ये लढत होईल. सुरगाणा येथे दोघांनी माघार घेतली आहे. त्यामुळे 17 प्रभागात 72 जणांमध्ये निवडणूक होणार आहे. देवळ्यात 11 जागांसाठी 38 अर्ज आले होते. त्यात 5 जणांनी माघार घेतली. त्यामुळे 33 जणांमध्ये लढत होणार आहे. या सर्व ठिकाणचा निकाल 19 जानेवारी रोजी लागणार आहे.
नाशिक महापालिका निवडणुकीत सन्मानपूर्वक आघाडी, भुजबळांचे संकेत, शिवसेना अन् काँग्रेस राजी होणार का?
Hogade on Mahavitaran| 12 हजार कोटींची वीजचोरी; कृषिपंपाचा वीजवापर फक्त 15 टक्के, होगाडेंचा आरोप