नाशिक : कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ आज कॉंग्रेसकडून तर भाजपकडून विरोधात आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले. राहुल गांधी यांची लोकसभा अध्यक्षांनी खासदारकी रद्द केली आहे. सूरत कोर्टाकडून राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यावरून ही कारवाई करण्यात आली होती. मोदी आडनावाचे लोक चोर कसे राहू शकतात असे विधान राहुल गांधी यांनी केले होते. त्यामुळे राहूल गांधी यांच्या विरोधात भाजपने तर दुसऱ्या बाजूला ही कारवाई चुकीची असल्याने राहुल गांधी यांच्या खासदारकी रद्दच्या कारवाईचा निषेध म्हणून समर्थनार्थ उतरल्याचे पाहायला मिळाले. नाशिकमध्ये भाजप आणि कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शने केली आहे.
नाशिकच्या रविवार कारंजा येथे भाजपा ओबीसी आघाडीच्या वतीने राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला कार्यकर्त्या देखील प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
महिला कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या पोस्टरला जोडे मारत निषेध आंदोलन केले तसेच राहुल गांधी यांच्या प्रतीकात्मक पुतळा देखील जाळण्यात आला. भाजपा नेते आशिष शेलार यांनी कडून आंदोलन केले जाईल अशी घोषणा करण्यात आली होती.
आज ठिकठिकाणी भाजपचे कार्यकर्ते आंदोलन करत आहे. राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्य म्हणजे ओबीसी समाजाचा अपमान असल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून करण्यात आला तसेच राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी देखील करण्यात आली.
तर दुसरीकडे सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना मानहाणीच्या केस मध्ये दोषी ठरवत त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर,लोकसभा अध्यक्षांकडून राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे.
याच निर्णयाच्या निषेधार्थ संपूर्ण देशात काँग्रेस पक्षाकडून आंदोलन केले जात आहे. संपूर्ण देशात याचे पडसाद उमटू लागले आहे. नाशिकमध्ये देखील राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या विरोधात शहर काँग्रेस कडून जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले.
नाशिकच्या शालिमार परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर शहर काँग्रेस कडून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्यने शहर काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील यावेळी तैनात करण्यात आला होता. कॉंग्रेस पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी यावेळेला जोरदार घोषणाबाजी केल्याचे पाहायला मिळाले. कॉंग्रेस आणि भाजप दोन्ही पक्ष आज रस्त्यावर उतरले होते.