नाशिकः आदिवासी विकास विभागांतर्गत अनुसूचित जमातीच्या (Scheduled Tribes) लाभार्थ्यांचे जमात प्रमाणपत्र पडताळणी करिता यापूर्वी नाशिक व अहमदनगर जिल्ह्यासाठी एकच कार्यालय होते. समितीतील प्रकरणांचा वाढता ओघ पाहता व लाभार्थ्यांच्या सोयीकरिता अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे दुसरे कार्यालय नाशिक 2 सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती सहआयुक्त तथा अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समिती, नाशिकचे उपाध्यक्ष किरण माळी यांनी दिली आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यातील हजारो नागरिकांचा प्रमाणपत्र पडताळणीचा त्रास थोडा कमी होणार आहे.
येथे होणार पडताळणी
शासनाने 13 सप्टेबर 2019 च्या निर्णयान्वये हे कार्यालय मान्यता प्राप्त असून, त्यानुसार 10 जानेवारी 2022 पासून नाशिक 2 कार्यालय कार्यान्वित झाले आहे. या नवीन समितीच्या कार्यक्षेत्रात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, देवळा, चांदवड, नांदगाव, निफाड, येवला, सिन्नर, हे तालुके व अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुके यांचे कार्यक्षेत्र निश्चित करण्यात आले आहेत. सबंधित तालुक्यातील व कार्यक्षेत्रातील उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज तसेच सेवा विषयक पत्रव्यवहार करताना सहआयुक्त तथा उपाध्यक्ष, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, नाशिक क्रमांक 2, दुसरा मजला गडकरी चौक, आदिवासी विकास भवन, नाशिक 422002 यांच्या नावे करावा, असे आवाहन सहआयुक्त किरण माळी यांनी केले आहे.
ऑनलाईन सुविधाही उपलब्ध
महाराष्ट्र शासनाच्या ई-गव्हर्नन्स धोरण 2011 नुसार नागरिकांना जलद सुविधा उपलब्ध होणाच्या हेतूने आदिवासी विकास विभागाने अनुसूचित जमाती वैधता प्रमाणपत्राची ऑनलाईन सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. या प्रणालीमुळे नागरिकांना जलद गतीने व पारदर्शी सुविधा मिळेलच, त्याशिवाय अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणीच्या कार्यक्षमतेमध्ये सुधारणाही होणार आहे. 1 मे 2016 पासून अनुसूचित जमातीकरिता जात पडताळणीचे वेबपोर्टल बदलण्यात आले आहे. ते आदि’प्रमाण’प्रणाली या नावाने सुरू करण्यात आले आहे. पूर्वी TRTI Caste Validity च्या अधिकृत संकेत स्थळावरून अनुसूचित जमाती करिता जातपडताळणी अर्ज भरण्यात आले होते.
नाशिक व अहमदनगर जिल्ह्यासाठी एकच कार्यालय होते. समितीतील प्रकरणांचा वाढता ओघ पाहता व लाभार्थ्यांच्या सोयीकरिता अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे दुसरे कार्यालय नाशिक 2 सुरू करण्यात आले आहे
– किरण माळी, सहआयुक्त तथा अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समितीचे उपाध्यक्ष
नाशिक जिल्ह्यातील हे तालुके
– मालेगाव
– देवळा
– चांदवड
– नांदगाव
– निफाड
– येवला
– सिन्नर
इतर बातम्याः
Nashik Jobs : घरबसल्या नोकरी मिळवा; नाशिकमध्ये ऑनलाईन रोजगार मेळावा, कसे व्हाल सहभागी?
Nashik Corona : नाशिक जिल्ह्यात 16 कोविड सेंटर सुरू; कुठे मिळतायत उपचार?