नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) पोषण आहारातील तांदूळ (Rice) हडपल्याच्या प्रकरणाची ‘एसआयटी’मार्फत चौकशी करावी, अशी मागणी करत भाजप (BJP) आमदार राम सातपुते यांनी विधिमंडळात लक्षवेधी मांडली आहे. सातपुते यांनी याबाबत एक पत्र लिहिले आहे. त्यात ते म्हणतात की, नाशिकमध्ये महिला बचतगटांच्या सदस्यांनी हिरावाडीतील ठाकरे मळा परिसरात 15 हजार किलो दडवलेल्या तांदूळ साठ्याचा भांडाफोड केला. या तांदळातून सव्वालाख विद्यार्थ्यांची भूक लागली असती. हा तांदूळ आपलाच असल्याची कबुली स्वामी विवेकानंद संस्थेचे ऋषिकेश चौधरी यांनी दिली. तरीही त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे याप्रकरणाची एसआयटी नेमून चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. सध्या हे प्रकरण दाबून टाकण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे समजते. यावर आयुक्त आणि शिक्षण अधिकारी काय अहवाल देणार याकडे लक्ष लागले आहे.
नेमके प्रकरण काय?
शासनाच्या आदेशाचा आधार घेत बचत गटांना बाजूला सारून 13 कंत्राटदारांना सेंट्रल किचन अंतर्गत मुलांना पोषण आहार देण्याचे काम दिले. तेच काम नाशिकमधील पंचवटीतील गुंजाळबाबा नगर येथे निफाड येथील स्वामी विवेकानंद संस्थेच्या कंत्राटदाराकडे देण्यात आले. कंत्राटदार हृषीकेश चौधरी याने याचाच लाभ घेत तब्बल 281 पोते तांदूळ म्हणजे 15 हजार किलोच्या धान्यावर डल्ला मारला. याची माहिती महिला बचत गटाला समजली. त्यांनी तपासणीसाठी आलेल्या प्राथमिक शिक्षण संचालयाच्या पथकाला माहिती देऊनही त्यावर कारवाई झाली नाही. मात्र, त्यानंतर महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांनी या ठिकाणी धडक दिली. पंचनामा केला. तेव्हा हा तांदूळ आपलाच असल्याची कबुली हृषीकेश चौधरी याने शिक्षणाधिकाऱ्यांना दिली.
कोणाचा वरदहस्त?
नाशिकमधील या 13 कंत्राटदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली होती. मात्र, ही कारवाई मागे घेण्यासाठी काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी जोर लावला होता. त्यासाठी त्यांनी सातत्याने लेखी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच शिक्षणंत्री वर्षा गायकवाड यांनी बैठक घेतली. आमदारांच्या या भूमिकेमुळे महिला बचत गटांमध्ये तीव्र असंतोष आहे. आता मात्र, कंत्राटदार हा तांदूळ निकृष्ट होता म्हणतोय, तर आमदार कंत्राटदार दोषी असल्यास कारवाई करा म्हणून हात झटकतायत. विशेष म्हणजे हे प्रकरण दडपण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.