नाशिकः नाशिक आणि पुणेकरांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी. ज्या रेल्वेमुळे नाशिक-पुणे अंतर अवघ्या पावणेदोन तासांवर येणार आहे, त्या हायस्पीड रेल्वेचे (high speed railway) काम आता सुस्साट सुरू झाले आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादनाकरिता 100 कोटी रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आला आहे. एकूण दीड हजार कोटी रुपयांचा हा महत्त्वकांक्षी प्रकल्प असून, पुण्यासह अहमदनगर आणि नाशिकरांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा, अशीच नाशिककरांची मनोकामना आहे.
असा आहे प्रकल्प?
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी एकूण 235 किलोमीटर लांबीचा लोहमार्ग टाकण्यात येणार आहे. नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यात हा मार्ग जाणार आहे. या मार्गावर एकूण 24 स्थानके असणार आहेत. या मार्गामुळे नाशिक-पुणे अंतर फक्त पावणेदोन तासांत काटले जाणार असून, ही रेल्वे प्रतितास 200 किलोमीटर वेगाने धावणार आहे. या प्रकल्पासाठीच्या मार्गिका मोजण्याचे, सर्च रिपोर्टचे आणि जिओ टेक्निकल सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गाच्या कामाचा काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आढावा घेतला आहे.
कोठे होणार भूसंपादन?
भूसंपादनाबाबत रेल्वे विभागाने दाखल केलेल्या प्रस्तावर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या प्रकल्पाचा मार्ग पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, जुन्नर आणि आंबेगाव या चार तालुक्यांतून जाणार आहे. त्यासाठी 575 हेक्टर भूसंपादन केले आहे. नाशिक आणि नगर जिल्ह्यातही भूसंपादन केले आहे. या कामासाठी जवळपास 1500 कोटींच्या निधींची गरज आहे. त्याचा पहिला टप्प्यातील 100 कोटींचा निधी जिल्हाधिकार कार्यालयाकडे आला आहे. मात्र, नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे भूसंपादनाला काही शेतकऱ्यां विरोधही केला आहे. वाकी बुद्रुकमध्ये हा विरोध होतोय. भूसंपादन करत असताना कुक्कुटपालन प्रकल्प , घर, ओटा, बोअर वेल, कांद्याची चाळ, विहिरी व इतर अनेक स्वरूपात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या हाय स्पीड रेल्वेच्या भूसंपादनाला विरोध केला आहे.
कधी पूर्ण होणार प्रकल्प?
नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेसाठीच्या प्रकल्पाला पंधराशे कोटी रुपये लागणार आहेत. आता फक्त शंभर कोटी रुपये आले आहेत. ही गती पाहता हा प्रकल्प कधी सुरू होणार, हे तूर्तास तरी सांगणे अवघड आहे. कारण येणाऱ्या काळात निधी मिळायला उशीर झाला, तर प्रकल्पाचा खर्च वाढू शकतो आणि तो बराच काळ रेंगाळूही शकतो.
Nashik Oxygen|राज्यातला सर्वात मोठा ऑक्सिजन प्लांट नाशिकमध्ये; उत्तर महाराष्ट्राचीही चिंता मिटली