चंदन पुजाधिकारी, नाशिक : नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरात इतर धर्माच्या लोकांच्या जमावाने जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच घडली होती. मात्र, मंदिराच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. या घटनेनंतर मंदिर समितीने तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाची चौकशी सुरु झाली आहे. तपासासाठी विशेष तपास पथक म्हणजेच SIT स्थापन करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. आता या प्रकरणी साधू महंत आक्रमक झाले आहे. महंत अनिकेतशास्त्री महाराज यांनी मशिदीत हनुमान चालीसा म्हणण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे.
काय म्हणाले महंत
महंत अनिकेतशास्त्री महाराज म्हणाले की, त्र्यंबकेश्वरमध्ये घडलेल्या घटनेनंतर मी मुस्लिम बांधवांना विनंती करतो की भाईचाऱ्याच्या नात्याने आम्हालाही मशिदीत हनुमान चालीसा म्हणण्याची परवानगी द्यावी, अन्यथा ही नोंटकी बंद करावी, असे अनिकेतशास्त्री यांनी म्हटले आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणी साधू महंत आक्रमक झाले आहेत.
ब्राम्ह्यण महासंघ आक्रमक
त्र्यंबकेश्वर मंदिरात इतर धर्मियांकडून घुसण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर ब्राह्मण महासंघही आक्रमक झाला. ब्राम्ह्यण महासंघाने पोलिसांना पत्र देऊन चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चौकशीचे आदेश दिले. गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप हे त्र्यंबकेश्वरला जाऊन चौकशी केली. यावेळी त्यांनी पुरोहित संघ तसेच काही ग्रामस्थांशी चर्चा केली. तसेच मंदिर परिसराचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. या प्रकरणी चार जणांना नोटीस बजावली आहे. त्यांना चौकशीसाठी बोलवले आहे.
ही परंपरा नाहीच
त्र्यंबकेश्वरमध्ये संदल काढण्याची प्रथा आहे की नाही, याबाबत अभ्यासक राजेश दीक्षित यांनी मत व्यक्त केले. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या महाद्वाराच्या रस्त्यावरून संदल जाते. मंदिराच्या बाहेरील रस्त्यावर धूप दाखवण्याची परंपरा आहे. मात्र या संदलमधील कोणीही मंदिराच्या पायरीजवळ किंवा मंदिराच्या आतमध्ये जाण्याची प्रथा नसल्याचे स्पष्टीकरण अभ्यासक राजेश दीक्षित यांनी दिली आहे.
तसेच दोन-तीन स्थानिक नागरिकांच्या कृतज्ञतेचा आणि भक्तीचा फायदा घेऊन कुणीतरी बाहेरील लोक या ठिकाणी चुकीची पायंडा-परंपरा पाडत असल्याचा आरोप देखील राजेश दीक्षित यांनी केलाय. तसेच त्र्यंबकेश्वर मंदिराच्या आतमध्ये इतर धर्मियांना प्रवेश नसल्याचे स्पष्ट मत राजेश दीक्षित यांनी मांडले आहे.