नाशिकः शैक्षणिक आणि परस्पर सहयोगी कार्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने नाशिक (Nashik) येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे अध्यासन (University Chair) निदेश विद्यापीठाच्या (University) संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी सांगितले की, विद्यापीठातर्फे अध्यासनामार्फत संशोधन कार्यात अधिक गतिमानता येईल. या अनुषंगाने संशोधनास चालना देण्यासाठी अध्यासन कार्य करणार आहे. विविध विद्याशाखा, उपचारपध्दती, आंतरविद्याशाखीय संशोधनाला यामुळे प्रोत्साहन मिळू शकेल. विद्यापीठाद्वारे निर्मित अध्यासनामार्फत समाजोपयोगी संशोधन, काळानुरूप आवश्यक संशोधन, वातावरणातील बदल व त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम याबाबत जागरुकता निर्माण करणेबाबतचे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. सदर अध्यासनामार्फत शास्त्रोक्त कार्यक्रम राबविण्यासाठी प्रायोजक संस्थेने आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
कोण असेल पात्र?
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की, विद्यापीठाचे संशोधन कार्य जागतिक दर्जाचे असावे, यासाठी अध्यासनामार्फत विविध संशोधन उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विद्यापीठाच्या अध्यासनात इच्छुक व्यक्ती, खासगी संस्था, शासकीय संस्था, नामांकित व्यक्ती, कंपनी, उद्योजक आदी क्षेत्र विद्यापीठ अध्यासन सुरू करण्यासाठी पात्र असतील. अध्यासनाचा उद्देश हा आरोग्य विज्ञान विद्याशाखांतर्गत आंतरविद्याशाखांमधील विविध संस्था व विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
किती रक्कम जमा करावी?
विविध विद्यापीठांतील संशोधन संस्थांमधील संशोधक व विद्यापीठ यांच्याशी संशोधनासाठी करार करण्यात येईल. इच्छुक संस्थांनी विद्यापीठामध्ये किमान एक कोटी रुपये जमा करणे आवश्यक असेल. या निधीतून अध्यासनाचा खर्च भागविण्यात येणार आहे. प्रायोजक संस्थांना सदर अध्यासनाचे नाव ठरविणे, प्रसिद्धीमाध्यमांमध्ये अध्यासन स्थापन केल्याची माहिती प्रसिद्धी करणे, बौध्दिक मालमत्तेवरील हक्कमध्ये सहभागी होण्याचे अधिकार देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
किती वर्षांचा कालावधी?
विद्यापीठ अध्यासनाचे कामकाज बोर्ड ऑफ चेअर समितीद्वारे सनियंत्रित करण्यात येणार आहे. सदर अध्यासनाचा कालावधी किमान पाच वर्षांचा असणार आहे. प्रायोजक संस्थेस वाटल्यास सदर कालावधी त्यांच्या इच्छेनुसार वाढवता येईल. अध्यासनातील संशोधनात्मक, प्रशासकीय व वित्तीय कारभार हा अध्यासन प्रमुख यांच्या देखरेखीखाली करण्यात येणार आहे. पहिल्या Chair Professor च्या तदर्थ स्वरुपातील नियुक्तीचे अधिकार विद्यापीठाचे कुलगुरू यांना असतील. एक वर्षानंतर Chair Professor ची विद्यापीठ नियमानुसार नियमित कालावधीसाठी नियुक्ती करण्यात येईल. विद्यापीठ अध्यासन स्थापन करणेबाबत नियमावली तयार करण्यात आली असून सदर नियमावली निदेश क्र. 02/2022 अन्वये विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ www.muhs.ac.in वर उपलब्ध करण्यात आली आहे.
Nashik | महापालिकेच्या कोषागार विभागात घोटाळा, नियमित भरण्यावरच डल्ला, नेमके प्रकरण काय?