नाशिक : विद्यार्थी कॉलेजला गेले की पालक त्यांना दुचाकी देतात. मुलांचे वय १८ वर्षे पूर्ण व्हायचे असते. अशावेळी त्यांच्याकडे गाडीचा परवानासुद्धा नसतो. आजकाल इलेक्ट्रीक गाड्या आल्या आहेत. त्यांना परवाना लागत नाही. यापैकी काही युवक सुसाट गाडी चालवतात. त्यामुळे अपघाताची शक्यता जास्त असते. त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांना दुचाकी देतात विचार करणे गरजेचे आहे. अन्यथा अपघात झाल्यास फार मोठी किंमत मोजावी लागते.
नाशिक शहरातील सातपूर-अंबड लिंक रोडवर अपघात झाला. एका अज्ञात वाहनाने क्लासला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दुचाकीला कट मारली. त्यामुळे दुचाकी दुभाजकावर आदळली. या अपघातात एका सोळा वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झालाय.
योगेश केणे, भावेश केणे आणि त्यांचा मित्र सार्थक राहाणे (वय १६ वर्षे) हे तीन मित्र. तिघेही सातपूर-अंबड लिंक रोडवरील जाधव संकुल येथे राहणारे. हे तिघे जण दुचाकीवरून सातपूर कॉलनीत क्लासला जात होते. एम्पायर हॉटेलसमोर अज्ञात वाहनाने दुचाकीला कट मारली. या अपघातात दुचाकी दुभाजकावर आदळली.
यावेळी सार्थक राहणे याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर योगेश आणि भावेश केणे हे दोघे भाऊ गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात हलवले. याप्रकरणी सातपूर पोलीस अधिक तपास करत आहे.
रस्त्याने वाहन चालवताना खूप काळजी घ्यावी लागते. अन्यथा कोणते वाहन कुठून येईल काही सांगता येत नाही. रस्ते चकाचक झाल्याने सुसाट वेगाने गाड्या चालवल्या जातात. त्यामुळे रस्ते अपघाताचे प्रमाण वाढले आहे. वाहन चालविताना खूप काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा जीवाला मुकावे लागते. मग, पश्चातापाशिवाय काही हातात राहत नाही.