नाशिक : शिवसेना खासदार (Shiv Sena MP) संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले. संजय राऊतांवरील कारवाई ही मूळ विषयाला बगल देण्यासाठी आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (Congress State President) नाना पटोले यांनी केलाय. ते म्हणाले, अग्निपथला विरोध होताच राहुल गांधी यांची ईडी चौकशी करण्यात आली. आता राज्यपालांविरोधात लोकांमध्ये चीड निर्माण झाली. या विषयाला बगल देण्यासाठी संजय राऊतांवर ईडी कारवाई करण्यात आली, असं नाना पटोले यांनी सांगितलं. नाना पटोले म्हणाले, राज्यपालांनी शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचे वस्त्रहरण आणि अपमानाचे काम केलं. लोकांमधील चीड डायव्हर्ट करण्याचा हा अयशस्वी प्रयत्न आहे. राऊतांनी सांगितले की, माझ्यावर केलेले आरोप हे खोटे आहेत. ब्लॅकमेलिंग आणि भीतीदायक काम नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकार करते आहे. ते लोकशाहीसाठी घातक आहेत. ईडीच्या कारवाईनंतर भाजपमध्ये जातात. महाराष्ट्रातील अनेक जण केंद्रात मंत्री झाले. त्यांच्यावर कारवाई का होत नाही. भाजपमध्ये गेलेल्यांचे काय शुद्धीकरण केले ते सांगावे, असा सवाल नाना पटोले यांनी विचारला.
नाना पटोले म्हणाले, झारखंडच्या अनुपसिंग नावाच्या आमच्या आमदारांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. झारखंड सरकार ते पाडायला निघाले आहे. पैशांची किती ऑफर आली ते टीव्हीवर चालू आहे. आसामला जे आमदार गेले होते त्यातील काही आले. 50 कोटींचा रेट चालला आहे, अशी चर्चा होती. भाजपकडे एवढा पैसे कुठून आला, असा सवाल त्यांनी केला. उद्या खासदारांनाही विकत घ्यायचे काम करतील, असंही ते त्यांनी सांगितलं
इंग्रजांविरोधात बोलले की कारवाई व्हायची. तशी ही कारवाई आहे. याला धक्का म्हणता येणार नाही. याला दबावतंत्र म्हणता येईल, जे भाजप करतंय. एखाद्या व्यक्तीचा आवाज दाबण्यासाठी हे दबावतंत्र वापरले जाते. ही हुकूमशाही जास्त काळ चालू शकणार नाही. अर्जुन खोतकर म्हंटले होते की मी नाईलाजास्तव चाललो. याचा उद्रेक होणार, याचे परिणाम केंद्र सरकारलाही भोगावे लागणार, असा इशारा पटोले यांनी दिलाय. दरम्यान, नाना पटोले हे मंत्रिमंडळ विस्ताराराव म्हणाले, सगळ्यांना मंत्री व्हायचे आहे. कोर्ट निकालामुळे हे सर्व थांबले आहे.