किशोर पाटील, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, जळगाव | 14 जानेवारी 2024 : माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सकाळी सकाळीच महाविकास आघाडीला हा मोठ्या राजकीय भूकंपाचा धक्का बसलेला असतानाच भाजपचे नेते आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आणखी नव्या भूकंपाचे संकेत दिले आहेत. फक्त 15 दिवस थांबा राज्यात आणखी प्रचंड मोठे भूकंप होणार आहेत. तुम्हाला वाटणारही नाही, असे नेते भाजपमध्ये येणार आहेत, असा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच महायुतीच्या भाजप, शिंदे गट आणि अजितदादा गट या तीनही पक्षांचा एकत्रितरित्या मेळावा पार पडला. आगामी निडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगावातील श्रीकृष्ण लॉनमध्ये हा मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील, भाजपचे मंत्री गिरीश महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील या तिघांची उपस्थिती होती. यावेळी गिरीश महाजन यांनी हे संकेत दिले.
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मीडियाशी संवाद साधताना हे संकेत दिले आहेत. मी तुम्हाला बोललो होतो की, राजकारणात मोठे मोठे भूकंप होतील. त्याप्रमाणे आज काँग्रेसचे मिलिंद देवरा यांचा शिवसेनेत प्रवेश झाला आहे. पुढे अजूनही मोठे भूकंप होतील, असं वक्तव्य भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी केले असून आगामी काळात आणखी मोठे राजकीय प्रवेश होण्याचे संकेत व्यक्त केले आहेत. आज मिलिंद देवरा यांचा शिवसेनेत प्रवेश झाला आहे. पुढच्या 15 दिवसात आपल्याला अपेक्षित नाही अशी लोक भाजपमध्ये प्रवेश करताना दिसतील, असं मोठं विधान गिरीश महाजन यांनी केलं आहे.
दरम्यान, काँग्रेसचे माजी मंत्री मिलिंद देवरा शिंदे गटात गेल्याने काँग्रेसमध्ये फूट पडणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यावर मंत्री अनिल पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे अनेक आजी माजी आमदार, खासदार आणि पदाधिकारी संपर्कात आहेत. राष्ट्रवादी सोबतच भाजप आणि शिंदे गटात मोठ्या प्रमाणावर विकासाचार विचार करून प्रवेश होणार आहेत. येणाऱ्या काळात काँग्रेसमध्ये अनेक धक्के बसताना दिसतील, असा दावा अनिल पाटील यांनी केला आहे.