नाशिक : मनसेने आगामी काळातील महानगरपालिका निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केलीय. त्यासाठी स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरलेत. राज ठाकरेंनी पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये तळ ठोकून वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि रणनीती तयार करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे या बैठकीला अनपेक्षितपणे अचानक अमित ठाकरे यांचीही हजेरी पाहायला मिळाली (Amit Thackeray may get new responsibility in MNS about Nashik).
अमित ठाकरे यांनी नाशिकमध्ये येऊन पहिल्यांदाच राजकीय बैठकीला हजेरी लावल्याचं बोललं जातंय. इतकंच नाही तर त्यांनी नाशिकमधील तरुणांसोबत फुटबॉल खेळण्याचीही मजा लुटली. या व्यतिरिक्तची महत्त्वाची घडामोड म्हणजे मनसे विद्यार्थी सेनेने अमित ठाकरे यांच्याकडे नाशिकची जबाबदारी देण्याची मागणी केलीय. त्यामुळे आगामी काळात अमित ठाकरेंकडे नाशिकच जबाबदारी दिली जातेय का? याकडे सर्वांचंच लक्ष आहे.
एकीकडे मनसे आगामी निवडणुकांची तयारी करत आहे, तर दुसरीकडे मनसेला धक्काही बसलाय. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन आदित्य शिरोडकर यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे मनसेत मोठी उलथापलथ होण्याचे संकेत मिळत आहेत. मनसेच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदाची धुरा थेट अमित ठाकरेंकडेच जाणार असून त्याबाबतची आजच घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आदित्य शिरोडकर यांनी काल महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे मनसेला मोठा धक्का बसला आहे. शिरोडकर यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्याने आता मनसेच्या विद्यार्थी संघटनेचं अध्यक्षपद अमित ठाकरेंकडे जाण्याची शक्यता आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यामुळे अमित ठाकरे आणि मनसेचे नेते संदीप देशपांडे तातडीने नाशिकला दाखल झाले आहेत.
नाशिकमध्ये राज ठाकरे यांची भेट घेऊन हे दोन्ही नेते विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदाबाबत चर्चा करणार आहेत. कदाचित राज ठाकरे दुपारी पत्रकार परिषद घेऊन अमित ठाकरे यांची विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत असल्याचं जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज यांच्या आजच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुंबई महापालिकेसाठी पुढील वर्षी निवडणुका होणार आहेत. त्यामुळे शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यातच आदित्य शिरोडकर यांनी मनसेला जय महाराष्ट्र केल्याने मनसेला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे शिरोडकर यांनी पक्ष सोडल्याने विद्यार्थी संघटना खिळखिळी होऊ नये म्हणून अमित ठाकरे यांच्याकडे विद्यार्थी संघटनेची धुरा देण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. अमित यांच्याकडे विद्यार्थी संघटनेची धुरा दिल्यास विद्यार्थी संघटना डॅमेज होणार नाही, उलट तरुणाईचा मनसेकडे ओघ वाढेल. तसेच विद्यार्थी संघटनेचा पालिका निवडणुकीच्या मोर्चेबांधणीत उपयोगही करता येईल. त्यामुळे अमित यांच्याकडे विद्यार्थी संघटनेची सूत्रे दिली जाऊ शकतात, असं सांगितलं जातं.