मालेगाव शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्यावर हल्ला झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अद्वय हिरे यांच्यावर सोयगाव भागात गुंडांनी हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अद्वय हिरे मालेगावातील एका कार्यकर्त्याच्या घरी गेले असता बाहेरून काही गुंडांनी त्यांच्यावर दगडफेक आणि धमकावल्याची तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी मालेगाव कॅम्प पोलिसात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू आहे. या घटनेनंतर अद्वय हिरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी “मला सुरक्षा देण्यात यावी”, अशी मागणी केली आहे.
अद्वय हिरे यांनी याप्रकरणी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “पालकमंत्री गुंड आहे. तो पराभवाच्या भयाने माझी हत्या करायला मागे-पुढे पाहणार नाही. जर माझ्या जीवाला काय झालं तर ही जबाबदारी पालकमंत्र्यांची आणि महाराष्ट्र शासनाची असेल. हल्ला करणारे कार्यकर्ते हे पालकमंत्र्यांचे होते. त्यांना जेलमधून सोडवण्याचं काम पालकमंत्री करतो”, असे आरोप अद्वय हिरे यांनी केले. “मी प्रचारालाही गेलो नव्हतो व्यक्तिगत भेटीसाठी गेलो होतो”, असंही अद्वय हिरे यांनी सांगितली.
अद्वय हिरे हे आधी भाजपात होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. यानंतर त्यांना ठाकरे गटाकडून मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या मतदारसंघात गेल्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये जिंकून आलेले पालकमंत्री दादा भुसे हे विद्यमान आमदार आहेत. अद्वय हिरे भाजपात असताना देखील दादा भुसे हे त्यांचे राजकीय विरोधक राहिले होते. आता दोन्ही नेते निवडणुकीच्या रणांगणात असल्याने कोण जिंकणार? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.