जळगाव | 26 सप्टेंबर 2023 : येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. जळगावमधून निकम यांना उभं करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे विद्यमान खासदाराचा पत्ता कट करून निकम यांना तिकीट देण्याचं भाजपमध्ये घटत आहे. त्यामुळे भाजपचे विद्यमान खासदार नाराज झाले आहेत. या खासदाराने थेट उज्जवल निकम यांच्यावरच टीका केली आहे. तसेच त्यांच्या विकासकामांची जंत्रीच सादर केली आहे. एवढेच नव्हे तर विद्यमान खासदाराचा पत्ता कापला जाणार असल्याची बातमी धडकल्याने आता हा खासदार राष्ट्रवादीत जाण्याची चर्चाही सुरू झाली आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत विशेष सरकारी वकील ॲड उज्ज्वल निकम यांना तिकीट देण्याची चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच लोकसभेचे तिकिट कापलं जाणार असणार असल्याची चर्चा रंगायला लागली आहे. यावर खासदार उन्मेष पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही प्रतिक्रिया देताना उन्मेष पाटील यांनी उज्जवल निकम यांच्यावरच निशाणा साधला आहे.
नुसतं मिरवायला खासदार व्हायचं नाही. लोकांची कामे करावे लागतात, असं सांगत खासदार उन्मेष पाटील यांनी उज्जवल निकम यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीकाी केली. तसेच उज्ज्वल निकम यांच्याशी आपले कौटुंबीक संबध आहेत. ते आमचे मार्गदर्शक आहेत. ते सुद्धा लोकसभेच्या उमेदवारीबाबत त्यांची भूमिका मांडतील, असं उन्मेष पाटील यांनी म्हटलं आहे.
खासदारकीच्या काळात मी जिल्ह्यात अनेक विकासकामे केली आहेत. देशातल्या टॉप टेन खासदारांमध्ये मी सुध्दा होतो. आमचा पक्ष प्रचंड हुशार आणि चाणाक्ष आहे. त्यामुळे माझी कामगिरी लक्षात घेवून पक्ष योग्य तो निर्णय घेईल. खासदार म्हणून जी जबाबदारी पार पडली, त्यानंतरही पक्ष, पक्षाचे वरिष्ठ नेते जो काही निर्णय घेतील तो मान्य राहिल. त्या निर्णयाशी मी बांधिल राहिल, असे खासदार उन्मेष पाटील यांनी म्हटलं आहे. पाटील यांनी सर्व जबाबदारी पक्षावर सोपवून आणि आपल्या कामाची जंत्री सादर करून एकप्रकारे भाजपला अडचणीत आणलं आहे. तसेच उज्ज्वल निकम यांना तिकीट देण्याच्या चर्चांवर प्रचंड नाराजीही व्यक्त केली आहे.
लोकसभेची उमेदवारी न मिळाल्यास उन्मेष पाटील हे भाजपसोडून राष्ट्रवादीत जाणार असल्याचीही चर्चा आहे. त्यावर पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पक्ष बदलण्याचा प्रश्नच येत नाही. कुणीतरी काहीतर वावड्या उठवत आहे. झारीतले शुक्राचार्य या प्रकाराला वेगळ रुप देण्याचा प्रयत्न करत असेल, पण मी भाजपचा एक प्रामाणिक सैनिक म्हणून काम करतोय आणि करत राहील, असं पाटील यांनी म्हटलं आहे.