नाशिकः वीजबिल वसुलीच्या सक्तीविरोधात राज्यभर आंदोलन छेडू, असा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी दिला आहे. ते नाशिकमध्ये (Nashik) बोलत होते. सध्या राज्यात अनेक ठिकाणी अघोषित भारनियमन (Loadshedding) सुरू आहे. यावरून राज्य सरकार विरुद्ध विरोधक असा सामना रंगताना दिसतोय. राज्य सरकारच्या वतीने या भारनियमनाचे कारण केंद्र सरकार पुरवत असलेला अपुरा कोळसा असे देण्यात येत आहे. मात्र, भाजपने हे खोटे आरोप असल्याचे म्हटले आहे. काही का असेना, पण राज्यात एकीकडे उन्हाळ्या उकाड्यात सर्वसामान्य नागरिक होरपळून निघत आहे. त्यात भारनियमामुळे तो मेटाकुटीला आलाय. दुसरीकडे यावरूनच राजकीय रणधुमाळी तापलेली पाहायला दिसते आहे. ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे देखील नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी बोलताना त्यांनी या लोडशेडिंगसाठी केंद्र सरकारला जबाबदार धरले. प्रवीण दरेकरांनी हे आरोप खोडून काढले.
राज्य सरकार जबाबदार
प्रवीण दरेकर म्हणाले की, महाराष्ट्रातल्या वीज टंचाईला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे. सध्या राज्यात अघोषित भारनियमन सुरू आहे. वीजबिल वसुलीसाठी सक्ती सुरू आहे. मात्र, या सक्तीविरोधात भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यातील महावितरणच्या सर्व कार्यालयावर हे आंदोलन करण्यात येईल, असा इशार त्यांनी यावेळी दिला.
ढिसाळ नियोजनाने वीजसंकट
दरेकर म्हणाले की, राज्य सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे आज राज्यावर विजसंकट कोसळले आहे. ऊर्जा खात्यात बेशिस्त कारभार सुरू आहे. देवेंद्र फडवणीस सरकारच्या काळात कधीच भारनियमन झाले नाही. कधीच वीज कनेक्शन तोडण्यात आले नाही. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला आज देखील सर्वात जास्त कोळसा देण्यात येत आहे. तरीही राज्य सरकार केंद्र सरकारवर आरोप करत असल्याचे ते म्हणाले.
देशभर वीजसंकट, तनपुरेंचा दावा
ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे येवल्यात म्हणाले की, हे फक्त महाराष्ट्रावरती आलेले संकट नाही. सध्या देशभरात सगळीकडे कोळशाचा तुटवडा आहे. याचा पुरवठा केंद्राकडून होतो. त्यामुळे सध्या महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा अगदी उत्तर प्रदेश सगळीकडे लोडशेडिंग मोठ्या प्रमाणावरती चालू आहे. फक्त महाराष्ट्र शासनाला दोष देण्यापेक्षा केंद्र शासनाने कोळशाचे नियोजन केले, तर फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरामध्ये हे संकट टळेल.
Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!