नाशिक : सगळीकडेच व्हेंटिलेटर बेडचा प्रचंड तुटवडा आहे. अनेक रुग्णांना व्हेंटिलेटर बेड न मिळाल्याने आपला जीवही गमवावा लागलाय. त्यातच केंद्र सरकारने नाशिक महापालिकेला दिलेल्या 60 व्हेंटिलेटरची दुरावस्था झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नाशिकच्या बिटको आणि झाकीर हुसेन या महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये केंद्राने पीएम केअर फंडातून हे व्हेंटिलेटर दिले. मात्र, केंद्राच्या पातळीवरील सावळ्या गोंधळाने हे व्हेंटिलेटर तब्बल 10 दिवस होऊनही रुग्णांच्या उपयोगासाठी आलेले नाहीत (Centre send 60 ventilators through PM Care fund but still not in use in Nashik).
केंद्र सरकारने नाशिकसाठी व्हेंटिलेटर तर पाठवले, मात्र व्हेंटिलेटर जोडण्यासाठी लागणारे आवश्यक सुटे पार्ट्स (कनेक्टर) सोबत पाठवण्यातच आले नाही. हे सुटे पार्ट मिळालेच नसल्याने पाठवलेले 60 व्हेंटिलेटर्स अक्षरशः धूळ खात पडून आहेत. विशेष म्हणजे शहरात एकीकडे एका एका व्हेंटिलेटरसाठी रुग्ण तडफडत आहेत. असं असताना तब्बल 60 व्हेंटिलेटर फक्त प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि निष्काळजीपणामुळे पडून असल्याचं बघायला मिळत आहे. या घटनेतून एकूणच केंद्रातील प्रशासनाचा अर्धवट कारभाराचा पर्दाफाश झालाय.
व्हेंटिलेटरची गरज असताना केलेल्या हलगर्जीपणाबद्दल नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया
व्हेंटिलेर्सची ही दुरुवस्था आणि प्रशासनाची अनास्था पाहून नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आम्ही आमच्या घरातील सदस्यांना गमावत असताना सरकार व्हेंटिलेटरही उपलब्ध करुन देत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. तसेच सरकारने आवश्यक वैद्यकीय सोयीसुविधा आणि औषधं तात्काळ उपलब्ध करुन द्यावेत अशीही मागणी होत आहे.
नाशिकमधील कोरोनाची स्थिती काय?
नाशिकमध्ये आज (6 मे 2021) रोजी कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ 4 हजार 160 इतकी आहे. तसेच पूर्ण बरे झालेले रुग्णांची संख्या 3 हजार 782 इतकी आहे. यात नाशिक मनपा हद्दीत 2487 रुग्ण, नाशिक ग्रामीण भागात 1612 रुग्ण, मालेगाव मनपा हद्दीत 18 आणि जिल्ह्याच्या बाहेरील 43 रुग्णांचा समावेश आहे.
नाशिक जिल्ह्यातील एकूण करोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा 3 हजार 741 पर्यंत पोहचलाय. आज दिवसभरात एकूण 49 कोरोना रुग्णांचे मृत्यू झालेत. यात नाशिक मनपा हद्दीतील 20, मालेगाव मनपा हद्दीतील 06 आणि नाशिक ग्रामीणमधील 23 कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा समावेश आहे.
नाशिकमधील प्रकाराचा काँग्रेसकडूनही निषेध
मोदी सरकारने #PMCareFunds च्या मधून 10 दिवसांपूर्वी नाशिक महापालिकेला 60 व्हेंटिलेटर पाठवले. परंतु ते कनेक्टरशिवाय पाठविल्याने वापरलेच गेले नाहीत. व्हेंटिलेटरची तीव्र निकड असताना असा हलगर्जीपणा अपेक्षित आहे का?
मोदी सरकारच्या योजना कौशल्य व व्यवस्थापनाचे कौतुक करावे तेवढे कमी!?— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 6, 2021
नाशिकमधील प्रकारावरुन काँग्रेसनेही मोदी सरकारवर टीका केलीय. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले, “मोदी सरकारने पीएम केअर फंडातून (PM Care Funds) 10 दिवसांपूर्वी नाशिक महापालिकेला 60 व्हेंटिलेटर्स पाठवलेत. परंतू ते कनेक्टरशिवाय पाठविल्याने वापरलेच गेले नाहीत. व्हेंटिलेटरची तीव्र निकड असताना असा हलगर्जीपणा अपेक्षित आहे का? मोदी सरकारच्या योजना कौशल्य व व्यवस्थापनाचे कौतुक करावे तेवढे कमी!”
दरम्यान, पीएम रिलिफ फंड ऐवजी पीएम केअर फंड सुरु केल्यापासूनच विरोधकांकडून त्यावर टीका होत आहे.
हेही वाचा :
पीएम केअर फंडातील 80 टक्के व्हेंटिलेटर जळगावात धूळखात, खासदार उन्मेश पाटील यांचा गंभीर आरोप
पुण्यात व्हेंटिलेटर नसल्याचा आरोप गिरीश बापटांनी फेटाळला, लॉकडाऊन एकमेव उपाय नसल्याचाही दावा
व्हिडीओ पाहा :