नाशिकः कोरोना लस न देताच प्रमाणपत्र दिल्याचा धक्कादायक प्रकार मालेगावमध्ये घडला असून, याप्रकरणी महापालिका शाळेतील 10 शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला. मालेगाव दोन्ही लाटेमध्ये हॉटस्पॉट ठरले. हे पाहता राज्य सरकारने लसीकरण वेगात राबवले. नाशिक जिल्ह्यातही लसीकरणाने मोठे उद्दीष्ट साध्य केले. मात्र, हे लसीकरण नेमके कशा पद्धतीने झाले याच्या एकेक सुरूस कथा आता बाहेर येत आहेत. लसीकरणासाठी अनेक ठिकाणी शाळेत केंद्र थाटण्यात आले होते. शिक्षकांना या कामी नियुक्त करण्यात आले होते. मालेगावमधल्या संगमेश्वर वॉर्डात जुलै महिन्यात लसीकरण मोहीम राबवली. यात 2 जुलै 2021 रोजी कर्तव्यावर असणाऱ्या शिक्षकांनी 13 जणांना कोविड लस न देताच प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले असून याप्रकरणी दहा शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, एकीकडे अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावांमध्ये लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. त्यात संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक 24, श्रीगोंदा तालुक्यातील 9, राहाता तालुक्यातील 7 तर पारनेर तालुक्यातील 6 गावांसह अकोले, कर्जत, कोपरगाव, नेवासा, पाथर्डी, शेवगाव, श्रीरामपूर या तालुक्यांतील गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये 13 ऑक्टोबरपर्यत कडक लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे नाशिककरांमागे चिंतेचा भुंगा लागला आहे. कारण नाशिकमधल्या सिन्नर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सतत 200 च्या जवळपास रुग्ण वाढत आहेत. सिन्नर तालुक्यातील नागरिकांचा नगरशी सातत्याने संबंध येतो. त्यामुळे येथील रुग्ण वाढत असल्याची शंका आहे. त्यात लसीकरणातला पहिला घोळ उघडकीस आल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यापूर्वीच कोरोना रुग्ण वाढल्यास कडक निर्बंध लावण्याचा इशारा दिला आहे.
मुख्यालय न सोडण्याची तंबी
निलंबित शिक्षकांना मुख्यालय सोडू नये, अशी तंबी देण्यात आली आहे. त्यांना रोज सकाळी दहा वाजता शिक्षणट मंडळ कार्यालयात हजेरी लावून स्वाक्षरी करावी लागेल. निलंबन काळात शिक्षकांना नियमाप्रमाणे निर्वाह भत्ता मिळणार आहे.
आयुक्तांना निवेदन
दरम्यान, याप्रकरणी शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. उर्दू शिक्षक संघाने महापालिका आयुक्त भालचंद्र गोसावी यांना निवेदन देत शिक्षकांचे निलंबन मागे घ्यावे, अशी मागणी केली आहे. त्यांनी उपायुक्त आणि प्रशासनाधिकारी यांनाही निवेदन दिले आहे.
इतर बातम्याः
Wife’s murder: टीव्ही बघणाऱ्या बायकोच्या डोक्यात मुसळ घालून खून; नाशिकमधल्या घटनेत आरोपीला जन्मठेप
RCB च्या नेतृत्वाबाबत विराटने मोकळं केलं मन, किंग कोहलीची 4 मोठी विधानं#RCB #viratkholi #IPL2021 #KKRvsRCB https://t.co/vt45F7aXZe
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 12, 2021