नाशिक : जिल्ह्यात कोरोना रूग्णसंख्या वाढत नसली तरी एक हजारांच्या आसपास स्थिर आहे. त्यामुळे आगामी काळात लसीकरणाचा वेग वाढवण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील संवेदनशील असलेल्या ठिकाणांचा व परिसराचा अंदाज घेऊन त्या ठिकाणांवर तत्काळ कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची मोहीम गतीमान करण्यात येणार आहे. याबाबत बोलताना छगन भुजबळ यांनी जनतेला काळी घेण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या तालुक्यांतील ग्रामीण भागात नागरिकांनी कठोर निर्बंधाची वेळ न येऊ देता सतर्कता बाळगून संभाव्य लाट थोपवावी, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात मालेगाव येथून कोरोना विषयक लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी बोलताना “नवरात्रोत्सव, दसरा दिवाळी यासारख्या सणांच्या निमित्ताने व बाजारांच्या निमित्ताने होणारी गर्दी वाढण्याची शक्यता आहे. तसेच प्रवासावर बंधने शिथिल झाल्यानंतर नागरिकांचा मुक्तसंचार वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना मास्क, सॅनिटाईजर, व सुरक्षित अंतराच्या नियमांचा अंगिकार केला नाही तर पुन्हा परिस्थिती गंभीर होऊ शकते,” असा इशारा छगन भुजबळ यांनी यावेळी दिला.
तसेच पुढे बोलताना “कॉन्टॅक्ट टेसिंगमध्ये एखादी आस्थापना वारंवार येत असल्याचे निदर्शनास आले तर संबंधित आस्थापना बंद करण्याची कार्यवाही करावी. गृह विलगीकरणात असलेल्या व्यक्तींची तपासणी करून त्या ठिकाणी गृह विलगीकरणाचे सर्व नियम पालन करण्यात येत असल्याची खात्री करावी. अन्यथा रुग्णास नजिकच्या सीसीसी (CCC) केंद्रात दाखल करावे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये येणाऱ्या व्यक्तींची कोविड चाचणी करणे बंधनकारक करावी,” असे निर्देश छगन भुजबळ यांनी यावेळी दिले.
जिल्ह्यात आजपासून कवच-कुंडल मोहीम सुरू झाली असून या मोहिमेत लोकसहभाग वाढविण्यासाठी काही नावन्यपूर्ण मोहिमांची जाणीवपूर्वक आखणी करण्यात यावी. आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आहोत. त्याचे औचित्य साधून सलग 75 तास लसीकरणाची मोहीम प्रायोगिक तत्वावर मालेगावमध्ये राबविण्यात यावी. त्याचबरोबर मालेगाव येथे सामान्य रुग्णालयात मंजूर ऑक्सिजन प्लांट तत्काळ कार्यान्वित करण्यात यावा. मालेगाव सामान्य रूग्णालयात आसपासच्या तालुक्यांतील रूग्णही येत असतात. त्यामुळे सध्याच्या जागेचे विस्तारीकरण करण्यासाठी एक मजला वाढविण्याचा 15 कोटी रूपयांचा प्रस्ताव देण्यात आला असून त्यास मंजुरीसाठी आरोग्य प्रशासनाने कार्यवाही करावी, अशी सूचना यावेळी कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केली.
इतर बातम्या :
पाकिस्तानला दे धक्का ! भारतीय रताउल आंब्यालाच ‘जीआय टॅग’ प्रदान
ज्या जेलमध्ये कसाबला ठेवलं, संजय दत्त राहीला, तिथंच आता आर्यन खानची रवानगी, कशी आहे आर्थर रोड जेल?
(chhagan bhujbal ordered to incrase corona vaccination contact tracing in nashik district)