भाजपने कोणत्याही परिस्थितीत सरकार पाडायचं ठरवलंय, पण त्यांना यश येणार नाही; भुजबळांचा टोला

| Updated on: Nov 26, 2021 | 5:40 PM

भाजपने कोणत्याही परिस्थितीत सरकार पाडायचं ठरवलंच आहे. त्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले असून त्यात त्यांना यश येणार नाही, असं राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज स्पष्ट केलं.

भाजपने कोणत्याही परिस्थितीत सरकार पाडायचं ठरवलंय, पण त्यांना यश येणार नाही; भुजबळांचा टोला
छगन भुजबळ, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री
Follow us on

नाशिक: भाजपने कोणत्याही परिस्थितीत सरकार पाडायचं ठरवलंच आहे. त्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले असून त्यात त्यांना यश येणार नाही, असं राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज स्पष्ट केलं. शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या कार्यालयावर ईडीची धाड पडली आहे. त्यावर भुजबळ यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

महाविकास आघाडीचे नेते किंवा मित्रांवर छापे टाकायचं त्यांनी ठरवलं आहे. कुठल्याही परिस्थितीत सरकार पाडायचं त्यांनी ठरवलं आहे. भाजपचे सरकार यावं, यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. त्यांच्या दुर्दैवाने त्यांना यश मिळत नाही आणि पुढेही काही वर्षे यश मिळेल, असं मला वाटत नाही, असा टोला त्यांनी लगावला.

राणेंना थांबायला सांगितलं का?

केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सरकार पडणार असल्याची भविष्यवाणी केली आहे. त्यालाही भुजबळ यांनी उत्तर दिलं आहे. सरकार पडेल थोडावेळ थांबा असं राणे म्हणालेत. थांबा म्हणजे राणेंना भाजपनं थांबायला सांगितलं असावं, असा चिमटा त्यांनी काढला.

लोकांचा अंत पाहू नका

यावेळी त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केलं. एसटी संपावर तोडगा काढण्याचे अनिल परब यांनी भरपूर प्रयत्न केले आहेत. विलीनीकरणासाठी समितीचा अहवाल येईपर्यंत थांबावं लागेल. समितीचा अहवाल येईपर्यंत एसटीचा कारभार कसा थांबवता येईल? सर्व प्रयत्न थकल्यानंतर काय करणार? भाजप आणि एसटीच्या संपकरी नेत्यांसोबतच्या चर्चेनंतर पगारवाढ देण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, लोकांचा जास्त अंत पाहू नये, असं आवाहन त्यांनी केलं.

तर वर्तमानपत्रंही कमी पडेल

साहित्य संमेलनासाठी वेळ कमी आहे. पण रात्र थोडी सोंग फार अशी अवस्था झाली आहे. निमंत्रण पत्रिकेत सर्वांची नावं टाकायची ठरली, तर वर्तमानपत्रही कमी पडेल. शक्य तितक्या चुका कमी होतील, हे पहा असं आयोजकांना सांगितलंय. काही लोकांचा त्रागा बरोबर आहे. मात्र काही लोकांना काही करायचं नसतं, त्यांच्याबाबत काही बोलायचं नाही, असंही ते म्हणाले.

कारवाई करताना पक्ष पाहू नका

नाशिकमधील हत्येबाबतही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. या प्रकरणी पोलिसांना कडक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाईच्या सूचना करण्यात आल्या आहेत. कारवाई करतांना पक्ष पाहण्याची आवश्यकता नाही असंही पोलिसांना सांगितल्याचं ते म्हणाले.

 

संबंधित बातम्या:

‘त्या’ कोंबड्यांसाठीच सरकार बनवण्याचं भाकीत, नवाब मलिकांचा नारायण राणेंवर पलटवार

ED Raid: शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या घरावर ईडीचा छापा, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कारवाई!

Video: वृद्ध आजोबांना भरवणारी चिमुरडी, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, याला संस्कार म्हणतात!