नाशिकः निसर्ग आणि पर्यावरणाचा समतोल ही वर्तमानाची गरज आहे. तसाच विचार पर्यावरण आणि विकासाच्या बाबतीत सर्वांना करावा लागेल. विकास आणि पर्यावरण हे जणू एकमेकांचे परस्पर विरोधी शब्द आहेत, असे वातावरण अलीकडे सर्वत्र निर्माण झाले असताना ‘मित्रा’ (Mitra) विकास आणि पर्यावरण यांच्यातील सांधा म्हणून काम करेल. पर्यावरणाचा सन्मान राखूनच शाश्वत विकास आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गुरुवारी केले.
नाशिक येथील महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण व संशोधन संस्था ‘मित्रा’च्या नूतन इमारतीच्या आणि मुख्य अभियंता कार्यालयाच्या इमारतीच्या ई-उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आभासी पद्धतीने तर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री दादाजी भुसे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य प्रधान सचिव सुजाता सौनिक, आमदार नरेंद्र दराडे, सरोज अहिरे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोरराजे निंबाळकर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, दिवसेंदिवस निसर्गाची बदलणारी रूपे त्यातून एकापाठोपाठ येणारी तोक्ते, निसर्ग आणि गुलाब यासारख्या चक्रीवादळांनी मानवी जीवनाला आत्मपरीक्षण करायला भाग पाडले आहे. त्याची प्रचिती आपल्या सगळ्यांना कालच मराठवाडा, विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात कमी अधिक प्रमाणात आली. या सर्वांची कारणमिमांसा करण्याची आपल्याला गरज आहे. विकासाच्या हव्यासापोटी आपण काही चुकीचे तर करत नाही ना? याचेही चिंतन व्हायला हवे. प्रत्येकाला आपल्या उद्योग व्यवसायाबरोबरच विद्यार्थी म्हणूनही जगावे लागणार आहे, त्यासाठी चांगल्या प्रशिक्षण संस्थांची गरज असते त्यात संपूर्ण देशात ‘मित्रा’च्या रूपाने एक पाऊल पुढे महाराष्ट्र आहे. ही प्रशिक्षण संस्था केवळ राज्य, देशात नाही तर संपूर्ण जगाच्या पर्यावरण अभियांत्रिकी संशोधनात खऱ्या अर्थाने ‘मित्रा’सारखे काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पाणी व्यवस्थापनाची आशा
पाण्याचे चांगले प्लांट उभारणे हे जसे गरजेचे आहे, त्याचप्रमाणे त्या प्लांटच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण पाणी घरारात नळाद्वारे पोहचवण्याचे व्यवस्थापन कौशल्य ही आजची नितांत गरज आहे. अतिवृष्टीमुळे पाणी दारातून घरात जातेय तेच पाणी दारातून न जाता ते नळातून घराघरात कसे पोहोचेल याचे व्यवस्थापन भविष्यात ‘मित्रा’ माध्यामातून होईल, असा विश्वास व्यक्त करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संस्थेचे ठिकाण, वातावरण, सोयीसुविधा यांचे कौतुक करून त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करून नाशिकला आल्यावर ‘मित्रा’ ला आवर्जुन भेट देण्याचे आश्वासन दिले.
मुख्य संसाधन केंद्र ठरणार
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, देशात राबविण्यात येणाऱ्या जलजीवन मिशन अंतर्गत ‘मित्रा’ संस्था मुख्य संसाधन केंद्र ठरणार आहे. 2024 पर्यंत हर घर जल हे उद्दीष्टपूर्ती करण्यासाठी तसेच पाणी पुरवठ्याच्या योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. त्याकरिता या प्रशिक्षण संस्थेचे योगदान महत्वपूर्ण ठरणार आहे. यशदा प्रशिक्षण संस्थेने प्रमाणेच अनेक आधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण अशी ‘मित्रा’ प्रशिक्षण संस्था देशपातळीवर नाव लौकीक मिळवेल, असा विश्वास मंत्री पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. (Chief Minister Uddhav Thackeray inaugurated the new building of ‘Mitra’ in Nashik)
इतर बातम्याः
Special Report: अहो, नाशिकच काय? गल्लीपासून दिल्लीपर्यंत…नावात बरंच काही आहे!