नाशिकः येवला, सिन्नर, निफाड येथे सातत्याने कोरोना रुग्ण वाढत आहेत. नागरिकांनी निर्बंध पाळले नाहीत, तर पुन्हा लॉकडाऊन लावण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिककरांना दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. मंदिरे सुरू करायला शासनाने परवानगी दिली आहे. एकीकडे कोरोनाची दुसरी लाट ओसरली. तिसऱ्या लाटेची चिंता नाही, असे भाकित वर्तवण्यात येत आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यातले येवला, सिन्नर आणि निफाडमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. याबद्दल लासलगाव येथे आलेले पालकमंत्री छगन भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले, जिल्ह्यातील काही भागामध्ये रुग्णवाढ होत आहे. नागरिकांनी निर्बंध पाळले नाहीत, तर पुन्हा लॉकडाऊन लावण्यात येईल. दुकाने बंद करण्यात येतील, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी त्यांना रस्त्यांबद्दल प्रश्न विचारला असता ते म्हणाले, सर्वत्र रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. लवकरच कॅबिनेटच्या बैठकीत हा प्रश्न मांडणार आहे.
787 रुग्णांवर उपचार सुरू
नाशिक जिल्ह्यात आज रविवारी 787 रुग्णांवर उपचार सुरू असून, रुग्णांमध्ये 54 ने घट झाली आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 3 लाख 99 हजार 750 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 646 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या उपचार घेत असलेल्या पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीण भागातल्या नाशिकमध्ये 60, बागलाण 5, चांदवड 35, देवळा 4, दिंडोरी 27, इगतपुरी 3, कळवण 8, मालेगाव 6, नांदगाव 10, निफाड 146, सिन्नर 131, सुरगाणा 1, त्र्यंबकेश्वर 5, येवला 79 अशा एकूण ५२० पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 245, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 15 तर, जिल्ह्याबाहेरील 7 रुग्ण असून अशा एकूण 787 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 9 हजार 183 रुग्ण आढळून आले आहेत.
नगरच्या 61 गावांमध्ये लॉकडाऊन
अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावांमध्ये लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नाशिककरांमागे चिंतेचा भुंगा लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर आणि नाशिकमध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. विशेष म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील 11 तालुक्यांतील तब्बल 61 गावांमध्ये लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. त्यात संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक 24, श्रीगोंदा तालुक्यातील 9, राहाता तालुक्यातील 7 तर पारनेर तालुक्यातील 6 गावांसह अकोले, कर्जत, कोपरगाव, नेवासा, पाथर्डी, शेवगाव, श्रीरामपूर या तालुक्यांतील गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये 13 ऑक्टोबरपर्यत कडक लॉकडाऊन असणार आहे. मात्र, यामुळे नाशिकरांची चिंता वाढली आहे. कारण नाशिकमधल्या सिन्नर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सतत 200 च्या जवळपास रुग्ण वाढत आहेत. सिन्नर तालुक्यातील नागरिकांचा नगरशी सातत्याने संबंध येतो. त्यामुळे येथील रुग्ण वाढत असल्याची शंका आहे.
इतर बातम्याः
Gold price: सणासुदीत सोने अजून स्वस्त, जाणून घ्या नाशिक सराफातले भाव!
15 बाजार समित्यांचे जंगी इलेक्शन, 22 जानेवारीला मतदान; नाशिकमध्ये महाविकास आघाडीची मोट बांधणार का?
Chipi Airport : ‘मुंबई’च्या उद्धव ठाकरेंचे ‘सिंधुदुर्ग’च्या नारायण राणेंना खास ‘पुणे’री टोमणे!https://t.co/BXrr2vFuAy#chipiairport #UddhavThackeray #NarayanRane
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 10, 2021