राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. छगन भुजबळ यांना एका अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली. त्याने मेसेज आणि फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. या धमकी प्रकरणी नाशिकमधील अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच त्यानंतर पोलिसांनी तातडीने अज्ञात आरोपीच्या शोधास सुरुवात केली. छगन भुजबळ यांना याआधीदेखील अनेकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी तपास करत धमकी देणाऱ्या आरोपीला शोधून काढलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने छगन भुजबळ यांना मोबाईलवर मॅसेज करत अश्लील शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली होती. यानंतर संबंधित घटनेची गंभीर दखल घेत या प्रकरणी नाशिक पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. यानंतर अंबड पोलीस ठाण्यात धमकी देणाऱ्या आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून आरोपीची ओळख पटली आहे.
रवींद्र यशवंत धनक असं धमकी देणाऱ्या आरोपीचं नाव आहे. त्याने 29 सप्टेंबरला छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. संबंधित घटनेप्रकरणी नाशिक पोलीस ठाण्यातही तक्रार करण्यात आली होती. नाशिक पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु होता. अखेर नाशिक पोलिसांनी आरोपीला शोधून काढलं आहे. नाशिक गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने आरोपी रवींद्र धनक याला बिड जिल्ह्यातून अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. आरोपीला आता काय शिक्षा होते? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.