नाशिक: भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर (kirit somaiya) झालेल्या हल्ल्याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सोमय्या यांना पोलीस ठाण्यात (police station) जाण्याची गरज नव्हती. लोकप्रतिनिधी म्हणून पोलीस ठाण्यात जाण्याचा अधिकार आहे. मात्र, कस्टडीतील व्यक्तीला भेटण्याचं काहीच कारण नाही. पण एखादी व्यक्ती कस्टडीत असते. त्यावेळी वकील किंवा तिच्या नातेवाईंकांनाच कोर्टात जाण्याची परवानगी असते. त्यामुळे सोमय्यांनी संघर्ष वाढवायला नको होता. झालं ते चांगलं झालं नाही, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले. सोमय्या यांनी पोलिसांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. सोमय्यांची ही मागणी वळसे पाटील यांनी फेटाळून लावली. ते काही मागणी करतील. नियमाप्रमाणे जे असेल ते होईल, असं ते म्हणाले. या व्यक्तिंना काय कारणासाठी झेड सेक्युरिटी दिली जाते. त्यांना कुणापासून धोका आहे. त्यांचं असं काय कृत्य आहे की त्यांना सुरक्षा दिली जाते, असा सवाल त्यांनी केला.
दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन कालपासून सुरू असलेल्या प्रकरणावर भाष्य केलं. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न होतोय. पण पोलीस सक्षम आहेत. राणा यांनी जी कृती केली त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली. त्यात काही चूक नाही, असं वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर जो हल्ला झाला. त्यानंतर आंदोलकांवर जे गुन्हे दाखल झाले तसेच गुन्हे शिवसैनिकांवर दाखल करण्याची मागणी राणा दाम्पत्यांनी केली होती. त्यावरही वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना गुन्हे दाखल झाले आहेत, असं सांगितलं.
राज्यातील आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून सतत काही ना काही सुरू आहे. हे सरकार राहिलं नाही पाहिजे त्यासाठी ज्या क्लृपत्या करायच्या त्या केल्या जात आहेत. हा त्याचाच एक भाग आहे, असं ते म्हणाले. राणा दाम्पत्याच्या कृती मागे कुणाचा तरी हात आहे. त्याशिवाय एवढं धाडस ते करूच शकत नाहीत, असंही ते म्हणाले.
उद्या भोंग्याच्या प्रश्नावर सर्व पक्षीय बैठक बोलावल्याचंही त्यांनी सांगितलं. विरोधी पक्षाची एक बैठक बोलावली आहे. त्यात भोंग्याचा प्रश्न कसा सोडवायचा हे जाणून घेण्यात येईल. मनसेलाही निमंत्रण देण्यात आलं आहे. सर्वांची मते जाणून घेऊन निर्णय घेऊ, असं त्यांनी स्पष्ट केलं.