जळगाव | 21 डिसेंबर 2023 : लोकसभा निवडणुकांना अद्याप अवकाश आहे. मात्र लोकसभेच्या जागेवरून जळगावात स्थानिक पातळीवर आतापासूनच भाजप आणि शिंदे गटांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. जळगाव लोकसभेच्या जागेवरून भाजपचे आमदार सुरेश भोळे आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील हे आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. दोघांनीही जळगाव लोकसभेच्या जागेवर दावा केल्याने आगामी काळात महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघांमध्ये तीन आमदार हे शिवसेना शिंदे गटाचे आहेत. तर 15 पंचायत समित्या या शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात आहेत. या संख्याबळाचा विचार केल्यास वरिष्ठ पातळीवरून जळगाव लोकसभेची जागा ही शिंदे गटाला मिळेल. आतापर्यंत आम्ही युतीधर्म पाळत आलो आहे. त्यामुळे आता भाजपने यावेळी आम्हाला मदत करावी, असं वक्तव्य करत शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांनी जळगाव लोकसभेच्या जागेवर दावा केला आहे.
दरम्यान, भाजपचे आमदार सुरेश भोळे यांनीही जळगाव लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला आहे. विद्यमान खासदार हे सुद्धा भाजपचेच आहेत. त्यामुळे जळगाव लोकसभेची जागा ही भाजपलाच मिळेल, असा विश्वास आमदार सुरेश भोळे यांनी व्यक्त केला आहे. तर काही कार्यकर्ते हे अतिउत्साही असतात त्यामुळे ते अशा प्रकारचे वक्तव्य करत असतात. पक्षश्रेष्ठींशी चर्चा करूनच अशा प्रकारचे वक्तव्य करावे, असे म्हणत आमदार सुरेश भोळे यांनी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांना चिमटा काढला आहे.
लोकसभेच्या जागांबाबत अद्याप वरिष्ठ पातळीवर महायुतीमध्ये कुठलाही निर्णय झालेला नाही. असं असताना जळगाव लोकसभेच्या जागेवर आतापासूनच शिवसेना शिंदे गट आणि भाजपने दावा केल्यामुळे आगामी काळात याच जागेवरून भाजप आणि शिंदे गटात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यताही आहे. वरिष्ठ नेते या जागेबाबत काय निर्णय घेतात याकडेही सर्वांचंं लक्ष लागलं आहे.