रवी गोरे, किशोर पाटील, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, जळगाव | 31 डिसेंबर 2023 : रावेर लोकसभा मतदारसंघात सासरा विरुद्ध सून असा सामना पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच राष्ट्रवादीकडूनही त्यांना तिकीट देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. तर दुसरीकडे त्यांचीच सून आणि भाजपच्या रावेरमधील विद्यमान खासदार रक्षा खडसे यांनीही तिसऱ्यांदा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघात सासरा विरुद्ध सून असा सामना रावेरकरांना पाहायला मिळणार का? अशी चर्चा रंगली आहे.
रावेर लोकसभेची जागा एनसीपीला मिळावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. रावेरची जागा लढण्याबाबत मी सुद्धा इच्छुक आहे. रावेरची जागा मिळाली तर माझ्याच नावाचा प्राधान्याने विचार करावा, अशी विनंती मी पक्षाला केली आहे. पक्षानेही मला रावेर लढण्याबाबत सांगितलं आहे, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं होतं.
दरम्यान, विद्यमान खासदार रक्षा खडसे यांनीही रावेरबाबत भाष्य केलं आहे. पक्षाने मला पुन्हा संधी दिली तर मी तिसऱ्यांदा खासदारकीची उमेदवार राहणार आहे. रावेरमधून लढण्याची माझी तयारी आहे. शेवटी पक्ष याबाबत काय निर्णय घेईल ते महत्त्वाचं असणार आहे, असं खासदार रक्षा खडसे म्हणाल्या.
रावेर लोकसभेसाठी गिरीश महाजन यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. गिरीश महाजन यांचं नाव पुढे येत असेल तर काही हरकत नाही. ते आमचे नेते आहेत. पक्षाने आदेश दिला तर आम्ही सर्व कार्यकर्ते पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठी उभे राहू. त्यांना जास्तीत जास्त मताने निवडून आणू, असंही रक्षा खडसे म्हणाल्या.
लोकसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडीचं आव्हान असलं तरी सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वालाच मान्यता मिळाली आहे. जनतेचा विश्वास मोदींसोबत आहेत. त्यामुळेच 2024लाही मोदीच पंतप्रधान होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.