महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर शहरात मोठा जमाव रस्त्यावर आला. या जमावाकडून रामगिरी महाराज यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. विशेष म्हणजे रामगिरी महाराज यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी वैजापूर आणि येवल्यात गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये रामगिरी महाराजांच्या वक्तव्याच्या विरोधात रोष बघायला मिळतोय. एकीकडे या सगळ्या घडामोडी सुरु असताना नाशिकमध्ये एका सप्ताहाच्या कार्यक्रमात महंत रामगिरी महाराज आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकाच मंचावर बघायला मिळाले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात मोठं वक्तव्य केलं. या राज्यात संतांच्या केसालाही धक्का लागता कामा नये, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. “या राज्यात संत परंपरा ही मोठी आहे. संतांच्या आशीर्वादामुळे राज्य कारभार सुरु आहे. म्हणून या महाराष्ट्रात संतांच्या केसाला सुद्धा धक्का लावण्याची हिंमत कुणी करणार नाही”, असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं.
“रामगिरी महाराज यांचं स्वागत करतो. इथे सर्वच उपस्थित आहेत. आम्हाला सभा घ्यायची असेल तर काय-काय करावे लागते. इथे न बोलवता सर्वजण आले आहेत. वारकरी संप्रदायाची ताकद आहे. वारकरी संप्रदाय आपल्या राज्यात गावागावात, तालुक्यात समाज प्रबोधनाचं काम करतो. रामगिरी महाराज असे दिशा देण्याचे काम करतात. आमच्यावर मंडप आहे. तुमच्याकडे मंडप नाही. वातावरणात देखील प्रसन्नता आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“आमचे धर्मवीर आनंद दिघे साहेब अखंड हरिनाम सप्ताह कधी चुकवत नव्हते. सर्व वारकरी भक्ती पंथावर चालणाऱ्यांना मी नमन करतो. तुम्ही सर्वजण अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सहभागी झालेले विठ्ठल स्वरूप आहात म्हणून मी आपले दर्शन घेण्यासाठी आलो. संत सहवास आणि हरिनामाचा जप केल्याने चिंता मिटते म्हणूनच मी भाग्यवान समजतो. सर्वसामान्य घरातला एक मुख्यमंत्री होतो. माझी आजी, आई-वडील मला पंढरपूरला घेऊन जायचे. ती आठवण मला आली”, असं एकनाथ शिंदे आपल्या भाषणात म्हणाले.
“या वेळस मी आषाढीला आठ दिवस अगोदर गेले, तिथे व्यवस्था पाहिली. आपल्याला पंढरपूरला चांगला अनुभव आला असेल. खऱ्या अर्थाने गोदावरी धाम १७७ वर्षापूर्वी अखंड हरिनाम सप्ताहाला सूरुवात केली. आपले महंत गंगागिरी महाराजांचं काम पुढे नेणारे रामगिरी महाराज यांचे आभार व्यक्त करतो. गिनीज रेकॉर्ड केल्याने वजन आणि उंची वाढली आहे. एक सकारात्मकता सगळ्यांनी जपली पाहिजे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.