नाशिकः नाशिक जिल्ह्यात येत्या 15 ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा राजकीय धुळवड रंगणार आहे. जिल्ह्यात तब्बल 192 सहकारी संस्थाच्या निवडणुका होणार आहेत.
नाशिक महापालिकेची निवडणूक येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. त्यापूर्वीच आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आता अवघ्या आठवडाभरात पुन्हा एकदा राजकीय धुळवड सुरू होणार असून जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या प्रलंबित निवडणुका होणार आहेत. त्यात विविध कार्यकारी संस्था, पगारदार पतसंस्था, ग्रामोद्योग संस्था, नागरी पतसंस्था, मजूर संस्था, पाणी वापर संस्थांचा समावेश आहे. दोन टप्प्यांमध्ये ही निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यात 49 विविध कार्यकारी संस्था, 8 पगारदार संस्था, 1 ग्रामोद्योग संस्था यांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात 5 विविध कार्यकारी संस्था, 2 पगारदार संस्था, 2 ग्राहक संस्था, 2 ग्रेप गोवर्स संस्था, 2 नागरी पतसंस्था, 48 मजूर संस्था, 2 पाणीवापर संस्था, 102 सर्वसाधारण संस्था, 4 जंगल कामगार संस्थांचा समावेश आहे.
नाशिक महापालिकेची निवडणूक येत्या फेब्रुवारी महिन्यात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर या निवडणुका होणार असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. यापूर्वी फेब्रुवारी 2017 मध्ये महापालिका निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी 29 प्रभाग 4 सदस्यांचे आणि 2 प्रभाग 3 सदस्यीय होते. या बहुसदस्यीय प्रभाव पद्धतीचा भाजपला पुरेपुर फायदा झाला. त्यांनी महापालिकेत निर्विवाद सत्ता काबीज केली. महापालिकेच्या एकूण 122 जागांपैकी 67 जागा भाजपने खिशात घातल्या. त्यानंतर शिवसेनेने 34 जागा मिळवत दुसरे स्थान पटकावले. काँग्रेस 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही अवघ्या 6 जागांवर समाधान मानावे लागले, तर कधीकाळी 39 जागा मिळवून सत्तेत असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पानिपत होऊन त्यांना फक्त 5 जागा मिळाल्या. आता पुन्हा प्रभागरचनेत बदल झाल्याने राजकीय वारे कुणाकडे फिरणार हे पाहावे लागले. यापूर्वीच सहकारी संस्थाच्या प्रलंबित निवडणुका होणार असल्याने त्याचे चित्रही नक्कीच महापालिका निवडणुकीत पाहायला मिळू शकते.
सहकारी पतसंस्थांच्या निवडणुकीमध्येही प्रचंड राजकीय हस्तक्षेप असतो. या पतसंस्था कुणाकडे जातात यावर महापालिकेचे बरेच गणित अवलंबून असते. आता एका प्रभागात तीन नगरसेवक सेवक असल्याने त्यांना एकेक मत महत्त्वाचे आहे. अनेक पतसंस्था आपले कर्मचाऱ्यांच्या मतांचा गठ्ठा एखाद्या नगरसेवकाकडे सरकावतात. त्यामुळे अनेक जण आश्चर्यकारकरित्या निवडूण येतात. हे सारे पाहता या सहकारी पतसंस्थांच्या निवडणुकातही रंगत येणार आहे. महापालिका निवडणुका संपेपर्यंत हा राजकीय ज्वर शिगेला पोहचणार आहे.
महापालिकेतील सध्याचे पक्षीय बलाबल
भाजप 67
शिवसेना 34
काँग्रेस 6
राष्ट्रवादी 6
मनसे 5
इतर 3
सध्याचे प्रभाग
29 प्रभाग 4 सदस्यीय
2 प्रभाग 3 सदस्यीय
अशी राहील नवी प्रभाग रचना
40 प्रभाग 3 सदस्यीय
1 प्रभाग 2 सदस्यीय
इतर बातम्याः
आमचा राम राम घ्यावा, मान्सून परतीच्या प्रवासावर; उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता
VIDEO : 36 जिल्हे 72 बातम्या | 7 October 2021https://t.co/xS1e7sht4c#36JILHE50BATMYA #36district50news #MarathiBatmya
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 7, 2021