जळगाव | 25 ऑक्टोबर 2023 : दुसऱ्या पक्षात जाण्याइतपत मी लेचीपेची नाही, असं विधान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे. पंकजा मुंडे यांनी जाहीरपणे पक्षांतर करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे या भाजप सोडण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. पंकजा मुंडे यांच्या या विधानावर भाजपमधून पहिली प्रतिक्रिया आली आहे. भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी पंकजा यांच्या विधानवर भूमिका मांडली आहे. पंकजा मुंडे यांनी जे वक्तव्य केल ते पक्षाच्या संदर्भात नसेल. मी नेमकं त्याच भाषणं ऐकलं नाही. ऐकल्या नंतर काय ते बोलत येईल, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
गिरीश महाजन यांनी यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला आहे. संजय राऊत यांच्या डोक्याचा इलाज केला पाहिजे यावर सर्वांचं एकमत झालं आहे. सरसंघचालकांनी आमच्यासोबत यावं, असं राऊत यांनी म्हणणं म्हणजे वेड्या माणसाने बरळण्यासारखं आहे. वाटेल तसं, वाटेल ते बोलायचे. त्यामुळे या माणसाच्या डोक्याचा इलाज केला पाहिजे, असं सर्वपक्षीय लोकांचे एकमत झाले आहे, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली आहे.
ठाकरे गटात केवळ चार पाच लोक शिल्लक राहिले आहेत. असं असताना संजय राऊत नको ती विधाने करत आहेत. हे असंच सुरू राहिलं तर त्यांच्या पक्षात केवळ दोनच लोक शिल्लक राहतील असं मला वाटतं, असा दावाही महाजन यांनी केला आहे.
यावेळी अमलीपदार्थांच्या मुद्द्यावरून त्यांनी सुषमा अंधारे यांच्यावरही टीका केली. त्यांचेही सरकार होते. त्यांचे नेते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांनी आमच्याकडे बोट दाखवण्यापेक्षा स्वतःकडे सुद्धा पाहावं.मातोश्रीवर त्या ललित पाटीलचा प्रवेश झाला. असं असताना आमच्यावर बेछूट आरोप करणे चुकीचे आहे. तुम्ही काहीही बोलला तरी लोकांना काय ते कळते. अमलीपदार्थांची तस्करी हा विषय मुळापासून संपवण्यासाठी सरकारने काम सुरू केलं आहे. त्यामुळे अमलीपदार्थांची तस्करी किंवा त्या व्यवसायात कुणी राजकीय पदाधिकारी असेल मग तो कोणत्याही पक्षाचा असेल किंवा सामाजिक संघटनेचा पदाधिकारी असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. जो कोणीही असेल आम्ही त्याला सोडणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावरही टीका केली. खडसे हे महिनाभर रुग्णालयात होते. ते इलाज अपूर्ण सोडून आले आहेत. खडसे हे खूप घाण आणि असंसदीय भाषा बोलत आहेत. घरापर्यंत काहीही बोलतात. त्यांच्या एवढ्या चोऱ्या पकडल्या जात आहे. मात्र त्याची काहीच लाज शिल्लक राहिलेली नाही. तुम्ही चोऱ्या करा आणि बिल आमच्या नावावर फाडा, असा हल्लाच त्यांनी चढवला आहे.