नाशिकः ऐन सणासुदीत नाशिक सराफा बाजारपेठेत सोन्याचे भाव घसरले आहेत. सोमवारी सोने पुन्हा स्वस्त झाले असून, चोवीस कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅम मागे 47,000 रुपये, तर बावीस कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅम मागे 45,170 रुपये नोंदवले गेले. दरम्यान, महाराष्ट्र बंदमुळे शहरातील अनेक सराफा दुकान बंद होते. त्यामुळे कोट्यवधींची उलाढाल थांबली.
सणाच्या तोंडावर सराफा बाजारात नाशिकमध्ये रोज जोरदार उलाढाल होताना दिसत आहे. विशेष म्हणजे सप्टेंबर महिन्यापासून सोन्याचे दर स्वस्तच झाले आहेत. 1 सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये चोवीस कॅरेट सोन्याचे दर 48,810, तर बावीस कॅरेट सोन्याचे दर हे 45,590 होते. त्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात अजूनही सोन्याचे दर स्वस्त आहेत. शनिवारी चोवीस कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅम मागे 47,000 रुपये, तर बावीस कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅम मागे 45,170 रुपये नोंदवले गेले. रविवारी आणि आज सोमवारीही हेच दर कायम होते. दरम्यान, आता सराफा व्यापाऱ्यांचे डोळे येणाऱ्या दसरा आणि दिवाळी सणाकडे लागले आहेत. साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणून दसऱ्याकडे पाहिले जाते. अनेकजण या दिवशी सोन्याची खरेदी करतात. सोन्याच्या अंगठ्या, लॉकेट, नाणे खरेदी करण्यावर ग्राहकांचा भर असतो. यंदा ऑगस्टपर्यंत नाशिकमध्ये म्हणावा तसा पाऊस नव्हता. मात्र, सप्टेंबरमध्ये जोरदार हजेरी लावली. त्यामुळे दसऱ्याला जोरदार उलाढाल होण्याचे संकेत आहेत. दरम्यान, पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किमती आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे.
एचडीएफसी सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून देण्यात आले आहेत. याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमवीर अनेक देशांमध्ये आर्थिक पॅकेजेस दिली जात आहेत. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती बँकांची अवस्था बिकट होऊ शकते. परिणामी आगामी काळात सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडू शकतात, असे क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून सांगण्यात आले आहे.
सोने खरेदी करण्यासाठी आता तुम्हाला दुकानात जाण्याची गरज नाही. कारण आपण दररोज पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरत असलेल्या ‘गुगल पे’ वरुनही आता सोनं खरेदी करता येईल. एवढेच नव्हे तर ‘गुगल पे’वर सोने साठवून ठेवण्याचीही सुविधा असेल. त्यामुळे तुम्हाला घरात सोनं ठेवण्याची जोखीमही पत्करावी लागणार नाही.
इतर बातम्याः
मंत्री भुजबळ म्हणतायत, काही व्यापारी भाजपला मानणारे; त्यामुळे त्यांचा बंदला विरोध
नाशिकमध्ये अजूनही म्युकरमायकोसिसचे 23 रुग्ण; कोरोनाच्या 783 रुग्णांवर उपचार सुरू
क्रिकेट खेळताना चक्कर येऊन अवघ्या 15 वर्षांच्या मुलाचा मृत्यू; नाशिकमधल्या रणभूमी मैदानावरील घटनाhttps://t.co/l9edk1a66S#Nashik|#cricket|#ground|#deathofachild
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 11, 2021