जळगाव | 7 जानेवारी 2024 : येत्या 10 जानेवारी रोजी आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय देणार आहे. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या निकालावर शिंदे गटाचं आणि राज्य सरकारचं भवितव्य ठरणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवलं तर नुसतेच आमदार अपात्र होणार नाहीत तर शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा ताबा मिळण्याचा उद्धव ठाकरे गटाचा मार्ग मोकळा होणार आहे. तर, शिंदे गटाचे आमदार पात्र ठरल्यास उद्धव ठाकरे यांच्या हातून कायमचा पक्ष आणि चिन्ह जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच दोन्ही गटातील नेते, पदाधिकारी, आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी मोठं विधान केलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र होणार आहेत. येत्या 10 तारखेला त्यांचा निकाल लागणार आहे, असा दावा विरोधकांकडून केला जात आहे. त्यावर राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट उत्तर देत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. आता युद्धाची तयारी सुरू झाली असून यावेळी मोठमोठ्या वावड्या उठवल्या जात आहेत. कुणी काय सांगत तर कुणी काय सांगतं? येत्या 10 तारखेला आमचं काय होईल? 10 तारखेला.. आम्हाला श्रद्धांजली अर्पण होते की आम्ही शहीद होतो.. ते काय होत आम्ही बघून घेऊ, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
आम्हाला धनुष्यबाण मिळेल की नाही ते आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बघतील. विरोधकांनी त्याची काळजी करण्याची गरज नाही, अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. जळगावात शिवसेना शिंदे गटाच्या लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत मार्गदर्शन करताना पाटील यांनी हे विधान केलं आहे.
याच बैठकीत गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांचे कानही टोचले. गावागावात कार्यकर्ते पदाधिकारी पक्षाचे बोर्ड सुद्धा लावत नाहीत ही खेदाची बाब आहे. गावाच्या वेशीवर आपल्या पक्षाचं बोर्ड असलंच पाहिजे. भूत, चुडैल येवू नये म्हणून गावाच्या प्रवेशद्वारावर मारुतीचं मंदिर असतं. तसं आपलं पक्षाचे बोर्ड असले पाहिजे, म्हणजे दुसऱ्या पक्षाला धाक राहील. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी गावाच्या वेशीवर पक्षाचा बोर्ड लावला पाहिजे, अशा शब्दात पाटील यांनी कार्यकर्त्यांना सुनावले.
घरात नवरा असणं जसं महत्वाचं असतं तसंच प्रत्येक मतदारसंघात आपला आमदार असणं गरजेचं आहे. यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागलं पाहिजे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. जायचं असेल तर सरळ जा आणि राहायचं असेल तर सरळ रहा, असा इशाराही त्यांनी दिला.
एखाद्या कार्यकर्त्यांनी फोन केला आणि तो उचलला गेला नसेल तर आम्ही पुन्हा मीटिंग किंवा काम आटोपल्यानंतर त्या कार्यकर्त्याला फोन करतो. कार्यकर्ता जेलमध्ये गेला आणि आम्ही फोन केला असं होणार नाही. जेल जाने से पहिले उसको बाहर निकालने की ताकद रखते, अशी फटकेबाजीही त्यांनी केली. जळगाव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि शिवसेनेचा बालेकिल्ला राहणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.