जळगाव | 17 सप्टेंबर 2023 : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यात विस्तव जात नाही. संधी मिळताच नाथाभाऊ हे फडणवीस यांच्यावर हल्ला चढवताना दिसत आहेत. फडणवीस यांच्यामुळेच आपल्याला भाजपमधून जावं लागल्याचंही ते सांगत असतात. फडणवीस यांनी भाजपमध्ये आपला छळ केला असा आरोपही त्यांनी केला होता. त्याचा पुनरुच्चार त्यांनी काल पुन्हा केला आहे. हा पुनरुच्चार करताना त्यांनी देवेंद्र फडणवीस हे कुणामुळे मुख्यमंत्री झाले याचा गौप्यस्फोटच एकनाथ खडसे यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यामुळे फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत. तर मग कुणामुळे फडणवीस मुख्यमंत्री झाले? याचा गौप्यस्फोट खडसे यांनी केला आहे.
एकनाथ खडसे यांनी मीडियाशी संवाद साधताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. देवेंद्र फडणवीस हे माझ्यामुळेच मुख्यमंत्री झाले. त्यांना मुख्यमंत्री करण्यामध्ये माझा मोठा वाटा आहे. देवेंद्र फडणवीस हे प्रदेशाध्यक्ष व्हावे यासाठीही मी मोठी मदत केली होती. एवढं करूनही उलट त्यांनी माझा छळ केला, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. खडसे यांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली असून त्यावर आता फडणवीस काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मी लहान सहान माणूस आहे. माझ्यामागे यंत्रणा लावल्या जातील, मला अडकवले जाईल, माझ्याबाबत असं काही राजकारण होईल याची मला अपेक्षा नव्हती. फडणवीस यांच्यासाठी मी खूप काही केलं. मात्र त्याच्या उलट मला जे काही मिळालं त्याची मला अपेक्षा नव्हती, अशी खंत आणि खदखदही एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.
यावेळी त्यांनी भाजपकडून ओबीसी नेत्यांचा छळ होत असल्याचाही आरोप केला. भाजपला बहुजनांचा चेहरा देण्याचे काम गोपीनाथ मुंडे, ना.स फरांदे, मी आणि आमच्यासह विविध नेत्यांनी केलं. त्यामुळेच या पक्षाला ओबीसींचा पाठिंबा मिळाला. आणि पक्षाचा विस्तार होऊन पक्ष वाढला. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे यांच्या प्रमाणे ओबीसींचे नेतृत्व भाजपकडून बाजूला केल जातंय. त्यांनी पक्षाला वाढवला त्यांनाच बाजूला करण्यात आलं. त्यामुळे भाजप हा ओबीसीवर अन्याय करतो की काय असं वाटतंय, असं नाथाभाऊ म्हणाले.
यावेळी त्यांनी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका केली. नया है वह, इसलिये उछल रहा है. उछलने दो… असे म्हणत खडसे यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्यावर पलटवार केला. चंद्रकांत पाटील यांनी माझं नाव घेतलं. ते व्यवस्थित दिसतात. त्यामुळेच ते माझं नाव घेऊन बोलतात, असा टोलाही त्यांनी लगावला.
यावेळी त्यांनी मराठवाड्यातील कॅबिनेटच्या बैठकीवरही टीका केली. कॅबिनेटच्या बैठकीत वेगवेगळे निर्णय होत असतात मात्र प्रत्यक्षात त्याचे व्यवस्थित रित्या अंमलबजावणी होत नाही. 2016 पूर्वी मराठवाड्यासाठी निर्णय घेतले होते. त्या निर्णयाची अद्याप पूर्तता झाली नाही. केवळ निर्णय घ्यायचे, अंमलबजावणी करायचे नाही हे म्हणजे मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसण्यासारखं आहे. सरकारकडे पैसा नाही. सरकार रोज कर्ज काढतंय आणि आपला संसार करतंय. त्यामुळे प्रत्यक्षात सरकारने केलेल्या घोषणांची अंमलबजावणी होईल असं वाटत नाही, असंही ते म्हणाले.