महायुतीकडून आज नाशकात विविध विकासकामांचं लोकार्पण आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमांचा धडाका लावण्यात आला होता. भाजप आमदार सीमा हिरे यांच्या आमदार निधीतील लोंढे ब्रिज ते वावरेनगर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पाडला. यावेळी मुंबई नाका परिसरात महात्मा ज्योतिराव फुळे आणि सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं लोकार्पण देखील करण्यात आलं. छगन भुजबळ म्हणाले की, ‘तब्येत बरी नाही. पण डिस्चार्ज घेऊन आलोय. महात्मा फुलेंच्या कार्यक्रमासाठीय अनेक वर्षांपासून मी तयारी करतोय कार्यक्रमाची. ते आमचे दैवत आहेत.’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सह मंत्री छगन भुजबळ आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थित हा लोकअर्पण सोहळा पार पडला.
दुसरीकडे मंत्री छगन भुजबळांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी शरद पवार गटाचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते. यावेळी ते शरद पवारांच्या आणि तुतारीच्या छत्र्या घेऊन उभे होते. हा नाशिककरांचा कार्यक्रम असल्याने आम्ही या ठिकाणी उपस्थित असल्याचं शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुतारी चिन्ह आणि शरद पवारांचा फोटो असलेल्या असंख्य छत्र्या मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी कार्यकर्ते घेऊन आले. ऑफिशियल कार्यक्रमाचे आमंत्रण असल्याचं शरद पवार गटाकडून सांगण्यात आलं. मात्र तरीदेखील सभा मंडपात न बसता सभा मंडपाच्या प्रवेशद्वारावर पदाधिकारी छत्रा घेऊन उभे होते.
यावेळी मराठा आणि धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाचा भूमिपूजन सोहळा देखील पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा झाला. मराठा समाजातील ५०० विद्यार्थी आणि ५०० विद्यार्थीनी तर धनगर समाजातील १०० विद्यार्थी आणि १०० विद्यार्थिनींसाठी हे वसतिगृह बांधण्यात येत आहे. भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्या निधीतून वसतिगृहाच्या उभारणीचं भूमिपूजन करण्यात आलंय.
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. खासदार राजाभाऊ वाजे यांच्यासह जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, महानगर प्रमुख विलास शिंदे, माजी आमदार वसंत गीते उपस्थित होते. नाशिकच्या मुंबई नाका परिसरात ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचा लोकार्पण पार पडला.