गणेश थोरात, नाशिक : इगतपुरीतील मुंढेगाव येथील जिंदाल कंपनीला लागलेली आग अजूनही धुमसतेय. गेल्या आठ तासांपासून ही आग धुमसतेय. आग इतकी भीषण आहे की आता कंपनीच्या बाहेरच्या परिसरातही आग पसरायला सुरुवात झालीय. त्यामुळे चिंता वाढली आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार या आगीत होरपळून दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय. तर 17 जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
जिंदाल कंपनीत आज बॉयलरचा स्फोट झाल्याने भीषण आग लागलीय. संबंधित घटना आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली. घटनेनंतर तातडीने प्रशासन सतर्क झालं. युद्ध पातळीवर रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं. कंपनीत अडकलेल्यांना बाहेर काढण्यात आलं.
जिंदाल कंपनीत बॉयलरच्या स्फोटानंतर आग लागली. ही आग अजूनही धुमसत आहे. या आगीने आता रौद्र रुप धारण केलंय. कंपनीच्या बाहेरच्या परिसरात आता आग पसरायला सुरुवात झालीय.
कंपनीच्या कम्पाउंडच्या बाहेर आता झाडंदेखील जळत आहेत. विशेष म्हणजे घटनास्थळापासून इगतपुरी रेल्वे ट्रॅक आहे. आगीच्या धुरांचे मोठमोठे लोळ लांबून दिसत आहेत.
घटनास्थळापासून इगतपुरी हायवे देखील जवळ आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. पण आग आणखी वाढत चाललीय. त्यामुळे अग्निशमन दलापुढील आव्हानं वाढत आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला सिल्लोड दौरा अर्धवट सोडून नाशिकमध्ये जाऊन घटनास्थळी भेट दिलीय. त्यांनी जखमी रुग्णांना भेट देऊन त्यांची विचारपूस केली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची माहिती दिली.
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना सरकारकडून पाच लाखांची मदत दिली जाईल, असा निर्णय झाल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच या दुर्घटनेत जखमी झालेल्या सर्व नागरिकांच्या उपचाराचा खर्च राज्य सरकारकडून केला जाईल, असंदेखील एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.