नाशिक/जळगावः गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आणि नाशिक-जळगावपासून ते थेट मुंबईपर्यंत (Mumbai) उन्हासोबतच महागाईचा (Inflation) पारा दिवसेंदिवस चढताना दिसतोय. त्यामुळे एकीकडे तापमान 44 अंशाच्या पुढे जाताना दिसते आहे. तर या उकाड्यापासून कच्चा बदाम…गाणं ऐकत का होईना लिंबू (Lemon) शरबत प्यावं म्हणलं, तर ते ही सामान्यांना अनेकदा शक्य होताना दिसत नाहीय. मोबाइलचे रिचार्ज अडीचशे रुपयात महिनाभर मिळत असेल, पण आता चक्क आता वीस-तीस रुपयांत मिळणाऱ्या किलोभर लिंबूसाठी कधी दोनशे तर कधी अडीचशे रुपये मोजावे लागतायत. महागाईच्या या झळांनी नाशिककर आणि जळगावकर मेटाकुटीला आलेत. त्यामुळे शरबताऐवजी फक्त थंड पाण्यावर ते समाधान मानून घेतायत. अहो, जळगाव, नाशिकच नव्हे, तर उभ्या महाराष्ट्रात हीच गत आहे. त्यामुळे या महागाईपासून दिलासा कधी मिळणार, याचाच प्रश्न ज्याच्या-त्याच्या ओठी आहे. मात्र, त्याचे उत्तर काही केल्या मिळताना दिसत नाहीय.
जळगावमध्ये लिंबू महाग झाले आहेतच, तर दुसरीकडे नाशिकमध्येही लिंबाचे दर किलोमागे अडीचशे रुपयांवर गेले आहेत. एकीकडे अवकाळी पाऊस आणि बेभरवशाचा निसर्ग यामुळे लिंबाच्या उत्पादनात घट झालेली पाहायला मिळत आहेत, तर दुसरीकडे हॉटेल व्यावसायिक आणि प्रत्येक घरातही लिंबाची मागणी वाढलीय. या मागणी आणि पुरवठ्यातील या असमतोलामुळेही लिंबाच्या दरात वाढ होताना दिसतेय. त्यामुळे आगामी काही दिवस, कदाचित या पूर्ण उन्हाळ्यात लिंबाचे दर चढेच राहण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
इंधन दरवाढीचा फटकाही सध्या बसताना दिसतोय. पेट्रोल-डिझेल यांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे साऱ्याच वाहतुकीवर त्याचा गंभीर परिणाम होताना दिसतोय. तेलापासून भाजीपर्यंत आणि धान्यापासून ते थेट बांधकाम साहित्यापर्यंत साऱ्याचे दर कितीतरी पटीने वाढतायत. दुसरीकडे युक्रेन आणि रशियाचे युद्ध सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात क्रूड ऑइलचे दर लवकर कमी होतील, ही शक्यता नाही. या साऱ्याचा फटका बसल्याने महागाई वाढताना दिसतेय. सामान्यांचा खिसा दिवसेंदिवस रिकामा होत चाललाय. हे सारे थांबणार कधी, याकडेच त्यांचे डोळे लागलेत.