नाशिकः अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावांमध्ये लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नाशिककरांमागे चिंतेचा भुंगा लागला आहे.
गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर आणि नाशिकमध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. विशेष म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील 11 तालुक्यांतील तब्बल 61 गावांमध्ये लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. त्यात संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक 24, श्रीगोंदा तालुक्यातील 9, राहाता तालुक्यातील 7 तर पारनेर तालुक्यातील 6 गावांसह अकोले, कर्जत, कोपरगाव, नेवासा, पाथर्डी, शेवगाव, श्रीरामपूर या तालुक्यांतील गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये 13 ऑक्टोबरपर्यत कडक लॉकडाऊन असणार आहे. मात्र, यामुळे नाशिकरांची चिंता वाढली आहे. कारण नाशिकमधल्या सिन्नर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सतत 200 च्या जवळपास रुग्ण वाढत आहेत. सिन्नर तालुक्यातील नागरिकांचा नगरशी सातत्याने संबंध येतो. त्यामुळे येथील रुग्ण वाढत असल्याची शंका आहे.
राज्याच्या मुख्य सचिवांच्या सूचना
अहमदनगरमधील वाढते कोरोना रुग्ण पाहता नाशिकमध्ये लक्ष ठेवावे. येथे कोरोना चाचण्या वाढवाव्यात, अशा सूचना राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी यापूर्वीच दिल्या आहेत. कुंटे यांनी नाशिक, नगर, पुणे, ठाणे, सातारा जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आढावा घेतला होता. यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. अहमदनगरमध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर सध्या रुग्णवाढीमुळे हॉटस्पॉट ठरत आहे. सिन्नर आणि नगरची सीमारेषा जवळ आहे. यामुळे या भागात रुग्ण वाढत असल्याची शक्यता आहे. ही सारी परिस्थिती लक्षा घेता नाशिक जिल्ह्यामध्ये चाचण्या वाढविण्याचे आदेश देण्यात आले होते.
जिल्ह्यात 911 रुग्णांवर उपचार सुरू
जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत मंगळवारी (5 ऑक्टोबर) सकाळी 11 वाजता प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील नाशिक जिल्ह्यात सध्या 911 रुग्णांवर उपचार सुरू आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये 62 ने घट झाली आहे. तसेच आत्तापर्यंत ८ हजार ६३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर 3 लाख 99 हजार 243 कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
नवरात्रोत्सवात कोरोना नियम कडक
कोरोना काळातही वणीच्या सप्तशृंगीगडावर नवरात्रोत्सवाची मोठ्या उत्साहात तयारी सुरू आहे. नवरात्र काळात हे मंदिर 24 तास खुले राहणार आहे. मात्र, भाविकांना पास शिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. 65 वर्षावरील व्यक्ती, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला आणि लहान मुलांना या काळात गडावर येऊ नये, असे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पास मिळवण्यासाठी कोरोनाचे दोन लसीचे डोस घेतल्याचा प्रमाणपत्र किंवा 72 तासांपूर्वी केलेल्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट बंधनकारक आहे.
इतर बातम्याः
आमच्याकडे टोल नाक्यांवर तर काय-काय चालतं; भुजबळांची शिवसेना आमदार कांदेंवर शेलकी टीका
तैमूर, जहांगीर नाही आता चर्चा सपना चौधरीच्या मुलाच्या नावाची! ‘हरयाणवी क्वीन’ने बर्थडे पोस्टमध्ये सांगितलं नाव…#SapnaChaudhary | #HaryanviQueen | #Entertainment https://t.co/R64az0YWJM
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 5, 2021