नाशिक : नाशिकमध्ये महायुतीत नेमकं कोणाला तिकीट मिळणार याची उत्सुकता असताना छगन भुजबळ यांनी संकेत दिले आहेत. भुजबळांकडून जिल्हा बँकेच्या कर्जाची परतफेड सुरु झाली आहे. तर शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी देखील प्रचार सुरु केलाय. नाशिकमध्ये उमेदवारी मलाच मिळेल आणि माझ्याशीच लढाई होईल असं शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे सांगत आहेत. पण तिकीट मिळण्याचे संकेत भुजबळांनीच दिले आहेत. भुजबळ कुटुंबीयांकडून नाशिक जिल्हा बँकेचं कर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.
28 कोटींपैकी पहिल्या टप्प्यात साडे 6 कोटी भरण्यात आले आहेत. वन टाईम सेटलमेंट योजनेत थकीत कर्ज भरलं जात असल्याचं कळतंय.
2011मध्ये आर्मस्ट्राँग इन्फास्ट्रक्चरसाठी नाशिकच्या जिल्हा बँकेकडून कर्ज घेण्यात आलं होतं. भुजबळांनाच नाशिकमधून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यासाठी जिल्हा बँकेच्या थकीत कर्जाची तक्रार होऊ नये म्हणून कर्ज परतफेड सुर झाली आहे.
नाशिकमध्ये स्पर्धा शिंदेच्या शिवसेनेकडून हेमंत गोडसे, भाजपचे दिनकर पाटील आणि अजित पवार गटाच्या भुजबळांमध्ये आहे. मात्र, भुजबळांना दिनकर पाटलांनी कडाडून विरोध केला आहे. भुजबळ मराठ्यांच्या विरोधात बोलले आहेत. त्यामुळं नाशिकमधून मलाच उमेदवारी मिळेल असं दिनकर पाटलांनी म्हटलंय.
तर इकडे उमेदवारी जाहीर झालेली नसली तरी शिंदेंचे खासदार हेमंत गोडसे यांनी प्रचाराला सुरुवात केलीये. गोडसेंनी कार्यालयात मतदार याद्यांची पडताळणी करण्यासह गेल्या 10 वर्षांच्या काळातील विकास कामांचं पत्रकांचं वाटप करणं सुरु झालं आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून 9 जणांची उमेदवारी आतापर्यंत घोषित झाली आहे.
रामटेकमधून विद्यमान खासदार कृपाल तुमानेंना तिकीट नाकारण्यात आलं. हिंगोलीतून हेमंत गोडसेंचा पत्ता कट झालाय. यवतमाळ-वाशिममधून भावना गवळींचा पत्ता कट झाला. 9 जणांच्या यादीत तिघांना तिकीट मिळालेलं नाही. आता नाशिककडे नजरा लागल्या आहेत. अजित पवार गटाच्या भुजबळांना तिकीट मिळालं, तर गोडसेंचाही पत्ता कट होईल. त्यासाठी गोडसेंनी तिसऱ्यांदा उमेदवारी मिळवण्यासाठी पूर्ण ताकद लावली आहे.
10 दिवसांआधी ठाण्यात मुख्यमंत्री शिंदेंच्या घराबाहेर कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलनही केलं. त्यावेळी शिंदेंनीही नाशिकचा आग्रह कायम ठेवल्याचा शब्द गोडसे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनाही दिला आहे.
नाशिकची निवडणूक 5 व्या टप्प्यात आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नोटिफिकेशन अद्याप निघालेलं नाही. त्यातच गोडसे आणि दिनकर पाटलांच्या स्पर्धेत भुजबळांच्या नावाची अचानक एंट्री झाल्यानं नाशिकचाही फैसला लांबला आहे.