चंदन पुजाधिकारी, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नाशिक | 14 ऑक्टोबर 2023 : आरक्षणाचा मुद्दा भाजपसाठी डोकेदुखी ठरणार असल्याचं चित्र आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून रान उठवलं आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जरांगे पाटील यांनी सरकारला डेडलाईन दिली आहे. तसेच आज जालन्याच्या अंतरवली सराटीत त्यांनी आरक्षणासाठी विराट सभेचं आयोजनही केलं आहे. एककीडे आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारची कोंडी झालेली असतानाच दुसरीकडे राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते आणि महायुतीतील महत्त्वाचे नेते महादेव जानकर यांनी थेट भाजपवरच आरक्षणाच्या मुद्द्यावरून हल्ला चढवला आहे. त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा भाजपसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मराठा, धनगर आणि आदिवासींना आरक्षण मिळालं पाहिजे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न देता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने आजवर खेळवत ठेवलंय. आता तेच भाजप करत आहे. भाजप काँग्रेससारखी वागत आहे, अशी टीका करतानाच आरक्षणासाठी भाजपने केंद्रात विधेयक मंजूर केलं पाहिजे, अशी मागणी महादेव जानकर यांनी केली आहे. महादेव जानकर मीडियाशी संवाद साधत होते.
धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी नरहरी झिरवळ यांच्यावरही टीका केली. ते संविधानिक पदावर आहेत, त्यांना असं बोलणं शोभत नाही. झिरवळ यांनी संयमाने घेतलं पाहिजे. आपण लोकप्रतिनिधी आहात. कोणत्याही जातीत मतभेद न करता सर्वांना आरक्षण दिलं पाहिजे, असा सल्ला जानकर यांनी झिरवळ यांना दिला.
राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. भुजबळ यांना धमकी येणं हे चुकीचं आहे. अशा धमक्या देऊ नका. ते योग्य नाही. भुजबळ आमचे दैवत आहेत. भुजबळ ओबीसी समाजाचे माईलस्टोन नेते आहेत. त्यांना धमकी दिली तर बाकीचा समाज गप्प बसणार नाही. या भानगडीत पडू नका नाहीतर आम्हाला विचार करावा लागेल, असा इशाराच जानकर यांनी दिला. अशा धमक्या देऊन काही होणार नाही. हे योग्य नाही. कायद्याने आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करा, असं आवाहनही त्यांनी केलं.