केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. 20 टक्के निर्यात शुल्क हटवलं आहे. यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये बोलले. “कांदा उत्पादक शेतकरी विशेषत: नाशिक, नगर, पुणे हे कांद्याच हब आहे. या भागातील जो शतकरी आणि अर्थात व्यापारी या सर्वांना मोठा फायदा होणार आहे. म्हणून ही मागणी केंद्र सरकारने मान्य केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि या समितीचे अध्यक्ष अमित शाह यांचे मनापासन मी आभार मानतो. यापुढे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जी, जी मदत करता येईल ती राज्य सरकार करत राहील” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. “आज मी त्र्यंबकेश्वरला जाऊन त्या ठिकाणी दर्शन घेतलं. पाहणी केली आहे. त्र्यंबकेश्वरचा एक विकास आराखडा ज्याला अलीकडच्या भाषेत कॉरिडोर म्हणतात. त्या आराखड्याच प्रशासनाकडून मी प्रेझेंटेशन घेतलं आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“सिंहस्थ कुंभ मेळ्याच्या निमित्ताने नाशिकचा विकास आपण करतोय. तसाच त्र्यंबकेश्वरचा विकास झाला पाहिजे. कारण त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंगांपैकी एक प्रमुख ज्योर्तिलिंग आहे. देशभरातून लोक तिथे येतात. जवळपास 1100 कोटींचा आराखडा तयार केला आहे. दोन टप्पे आहेत. पहिला टप्पा सिंहस्थ कुंभ मेळ्यापूर्वी पूर्ण करता येईल. त्यानंतर दुसरा टप्पा होईल” असं देवेद्र फडणवीस म्हणाले.
‘पुढच्या तयारीला लागावं’
“दर्शनाकरीता कॉरिडोर तयार करणं असेल, पार्किंगची व्यवस्था असेल, शौचालयांची व्यवस्था असेल, आपली जी तिथे वेगवेगळी कुंड आहेत, त्या कुंडांच रिस्टोरेशन, प्रमुख मंदिरांच रिस्टोरेशन, वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी करणं. मागे ब्रह्मगिरी आहे, हा परिसर अतिशय सुंदर आहे. प्रशासनाला मी सांगितलय त्यांनी पुढच्या तयारीला लागावं” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
‘खूप मोठ्या प्रमाणात निधी लागणार, पण…’
“नाशिकमध्ये 11 पुल बांधत आहोत. रस्त्यांच मोठ जाळ तयार करत आहोत. घाट वाढवत आहोत, सोयीसुविधा वाढवतोय. एसटीपीच जाळं करुन पाणी शुद्ध कारयचय, त्या दृष्टीने आराखडा तयार केला आहे. कुठल्याही परिस्थितीत सिंहस्थ कुंभ मेळ्याआधी काम पूर्ण करण्याचा प्लान आहे. या सगळ्या विकासकामांसाठी खूप मोठ्या प्रमाणात निधी लागणार आहे, पण राज्य सरकार म्हणून मी, एकनाथ शिंदे अजितदादा आम्ही तिघांनी निर्णय घेतलाय, याला कुठल्याही निधीच कमतरता पडू देणार नाही” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.