नाशिक : मध्यावधी निवडणुका कधी लागतील हे मला माहीत नाही. पण येत्या निवडणुकीत भाजपची पीछेहाट होईल, हे लोकांचे मत आहे. लोकांच्या विरोधानंतर राज्यपालांना बदलण्यात आलं. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित होण्याची शक्यता आहे. पण येत्या महिन्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते का? असा प्रश्न लोकांच्या मनात आहे. भाजपा स्वतःकडे पॉवर ठेवण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शक्यता आहे. नवीन राज्यपाल आल्याने राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता, माझे वैयक्तिक मत आहे, असं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलं. नवे राज्यपाल आल्याने राष्ट्रपती राजवट लागू शकते, असं लॉजिकही त्यांनी दिल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.
आमदार रोहित पवार यांनी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. ते आज काय बोलतील आणि उद्या काय बोलतील, हे राजकारणाच्या परिस्थिती यावर अवलंबून असते. विधान परिषद निवडणुकीत भाजपची जी परिस्थिती झाली आहे, त्यावरून लोकं त्यांच्या विरोधात आहे, असं वाटतं, असं रोहित पवार म्हणाले. यावेळी पहाटेच्या शपथविधीवरूनही त्यांनी टोले लगावले. आज लोकांना काय हवंय यावर चर्चा केली पाहिजे. भाजपकडून सहानुभूती मिळवण्यासाठी भावनिक राजकारण सुरू आहे, अशी टीका रोहित पवार यांनी केली.
यावेळी त्यांनी मंत्री उदय सामंत यांच्या एका प्रश्नावर भाष्य केलं. भूकंप होत असताना घरे कुणाची पडतात, हे बघावे लागेल. त्यात त्यांचेच नुकसान सर्वात जास्त होण्याची शक्यता आहे, असा चिमटा त्यांनी काढला. चिंचवडच्या निवडणुकीत जे अपक्ष उमेदवार उभे आहेत, त्यांच्याकडे किती खोके आले हा प्रश्न आहे. लोकं हे विकास आणि माणूस कोण उभा आहे यावर मतं देतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
भावी मुख्यमंत्री म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांचे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यावरही रोहित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कार्यकर्ता काय लावतो हा विषय आहे. पण प्रेमापोटी हे सगळं होत असतं. निर्णय घेताना सर्व नेते एकत्रित निर्णय घेतात. विरोधी पक्षाकडे कोणताही मुद्दा नसल्याने ते असे विषय काढत आहे, अशी टीका त्यांनी केली. भाजपचे नेते निलेश राणे यांनी कमरेखालच्या भाषेत ट्विट केलं होतं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ज्या व्यक्तींना सभ्य भाषा माहित नाही, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार?, असा सवाल त्यांनी केला.
भाजपमध्ये काय खदखद आहे, हे आपण बघतो. निष्ठावंत लोकांना तिथे संधी दिली जात नाही. त्यांना जेवढे घ्यायचे, तितक्या जास्त प्रमाणात घेऊन जा म्हणजे युवकांना संधी मिळेल, असा चिमटा त्यांनी काढला.ज्यावेळी अनेक गोष्टी हाताबाहेर जातात, त्यावेळी अशी वक्तव्ये केली जातात. एकनाथ शिंदे फक्त मराठा समाजाचे मुख्यमंत्री आहेत का? या गोष्टी अयोग्य आहेत. सर्व समाजासाठी एकत्रित धोरण ठरविणे गरजेचे आहे. इतर समाजाचे देखील प्रश्न प्रलंबित आहे, अशा शब्दात त्यांनी गुलाबराव पाटील यांना सुनावले.
पोटनिवडणुकीत पैशाचा वापर होत आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. लोकांमध्ये तशा चर्चा आहेत. भाजपच्या काही कार्यकर्त्यांना पैसे वाटताना पकडण्यात आले आहे. या निवडणुकीत भाजपने किती आर्थिक ताकद लावली आहे? सर्व महत्त्वाचे नेते तिथे व्यस्त आहेत. निधीचा वापर मतांचे विभाजन करण्यासाठी होतो आहे. वंचित बहुजन आघाडी अप्रत्यक्षरित्या भाजपाला मदत करत आहे, असा दावा त्यांनी केला.
विकास कुणी केला, हे लोकांना माहीत आहे. सध्या गुंडागर्दी सुरू आहे. लोकं विकासाच्या बाजूने निर्णय घेतील, असा मला विश्वास आहे. राजकारण, सरकारचे निर्णय आणि निवडणुका याचे योगायोगाने टायमिंग साधलं जात आहे, असंही ते म्हणाले.