चैतन्य गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नाशिक | 18 ऑक्टोबर 2023 : मनोज जरांगे पाटील हे आरक्षणाच्या मुद्दयावरून अधिकच आक्रमक झाले आहेत. जालन्यातील सभा प्रचंड यशस्वी झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आता थेट प्रस्थापितांवर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. प्रस्थापितांमुळेच आम्हाला आरक्षण मिळालं नाही. प्रस्थापितांनी मनावर घेतलं तर आम्हाला दोन तासात आरक्षण मिळेल, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. नाशिकमध्ये मीडियाशी संवाद साधताना जरांगे पाटील यांनी थेट मुळावरच घाव घातला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी नाशिकच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल असेलल्या कार्यकर्त्याची भेट घेतली. विलास गाढे असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकच्या येवला येथे जरांगे पाटील यांची सभा असताना स्वागताच्या वेळी दुर्घटना होऊन काही कार्यकर्ते जखमी झाले होते. यावेळी विलास गाढे हे देखील जखमी झाले होते. गाढे यांच्यावर अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी रात्री 2 वाजता त्यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. जरांगे पाटील यांनी मध्यरात्री येऊन विचारपूस केल्याने विलास भारावून गेला होता. त्याला अश्रू अनावर झाले.
यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला. जखमी तरुणाची मी विचारपूस केली. त्याची प्रकृती बरी आहे. लवकरच त्याला डिस्चार्ज होईल. पण सरकार किती दिवस आम्हाला वेदना देणार आणि आमचे बळी घेणार आहे? हे मात्र समजायला तयार नाही. या आगोदरच आरक्षण दिलं असतं, तर आमच्यावर ही वेळ आली नसती. सरकारने आमच्यावर पूर्वीपासून अन्याय केला. आणखी देखील बळीची अपेक्षा आहे. त्यांनी थांबवलं पाहिजे, नाहीतर महागात पडेल, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
आम्हाला समाजाचे सेवक म्हणून काम करायचं आहे. प्रस्थापित लोकांमुळेच आमच्यावर ही वेळ आली. त्यांनी जर मनावर घेतलं तर दोन तासात आरक्षण मिळेल. त्यांनी आमच्याकडून वेळ घेतलाय, आम्ही दिला नाही. त्यामुळे त्यांना आरक्षण द्यावं लागेल. मुख्यमंत्री साहेब शब्द पाळतील. आम्हाला नक्की आरक्षण देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
40 दिवसानंतर आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही. मात्र ही खदखद अनेक वर्षांपासूनची आहे. आता लाट बाहेर पडत आहे. ज्यांना आम्ही प्रतिष्ठित समजत होतो, ते चिल्लरपणा करायला लागले. पैसे कमवण्यासाठी आंदोलन करत नाही, न्याय देण्यासाठी आंदोलन आहे, असं ते म्हणाले.
त्यांना वाटलं, आम्ही जमीनच विकत घेतली. आमचे कपडे प्रस्थापित लोकांमुळेच फाटले. भुजबळ साहेब यांना व्यक्तिगत विरोध नाही. आम्हाला टीका करायची म्हणून आम्ही आंदोलन करत नाही. पण आरक्षणाला विरोध केला तर कुणालाच सोडणार नाही. ग्राउंड लेव्हलवर मराठा आणि ओबीसी दोन्ही बांधव एकत्र आहेत. काही आमचे आणि काही त्यांचे दोन तीन जण आरक्षण मिळवू देत नाहीत, असा दावाही त्यांनी केला.