मनोहर शेवाळे, Tv9 मराठी, नाशिक | 9 ऑक्टोबर 2023 : मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी भाषण केलं. विशेष म्हणजे त्यांच्या भाषणावेळी श्रोते उन्हात उभे होते. त्यामुळे जरांगे पाटील देखील व्यासपीठावरुन उठून खाली आहे. त्यांनी उन्हात उभं राहून भाषण सुरु केलं. “मला खुर्ची नाही पाहिजे, मराठ्यांना आरक्षणच पाहिजे. सरसकट कुणबी आरक्षण पाहिजे. आता मागे हाटायचं नाही. आरक्षण मिळू नये म्हणून खूप जण डोकावत होते, तुमच्या लेकराने त्यांचाही बंदोबस्त केला”, असा टोला मनोज जरांगे यांनी लगावला. “ज्या मराठा आंदोलकावर हल्ला झाला त्याच्यावर आज मुंबईत शस्रक्रिया आहे”, असं जरांगे यांनी यावेळी सांगितलं.
“आमच्यावर हल्ला का केला? याचे उत्तर अजूनही दिले नाही. ज्या माय माऊलीच्या अंगावर रक्त सांडलं होतं त्या माय माउलीने सांगितले आता आरक्षण घेतल्याशिवाय थांबायचं नाही. विदर्भातील मराठे शेतकरी म्हणून त्यांना आरक्षण, तर आम्ही काय समुद्रात आहोत का? आम्ही पण शेती करतो”, असं मनोज जरांगे म्हणाले.
“जी जात मागास सिद्ध झाली ती जात मराठा आहे. त्यामुळे ओबीसीमधून आरक्षण मिळालेच पाहिजे. 40 दिवस देतो पण आरक्षण पाहिजेच, सगळे कामालाच लागली. माझ्या नादाला लागले की कार्यक्रम उलटा असतो, तुम्ही म्हणाले आरक्षणाला विरोध नाही म्हणून उपोषण सोडलं”, असं जरांगे म्हणाले. “मंत्री छगन भुजबळ म्हणाले, आमची 60 टक्के लोकसंख्या, 60 टक्के ओबीसी, 34 टक्के मराठे, 20 टक्के एससी, एसटी. 150 टक्के लोकसंख्या असते का? मंडल कमिशन ने दिलेले 14 टक्के घ्या, आमचे आरक्षण आम्हाला द्या”, असंही जरांगे यावेळी म्हणाले.
“आम्ही तुमचा द्वेष केला नाही. तुमची जात बघितली नाही. मराठा म्हणून तुमच्या खांद्याला खांदा लावून काम केलं. तुमची प्रतिष्ठा कमी होऊ दिली नाही. ओबीसी नेत्यांची प्रतिष्ठा वाढवली, आम्ही तुम्हाला आपलं मानतो. आमच्या गोर-गरीब पोरांवर वेळ आलीय तर तुम्ही आपलं मानायला तयार नाहीत. आरक्षण द्यायची वेळ आली तर देऊ नका म्हणतो, भाऊ आरक्षणच घेत असतो”, असंही जरांगे यावेळी म्हणाले.
“तुम्ही सांगायला पाहिजे. मराठा समाजाने उपकार केले ते फेडायची वेळ आलीय, याची तुम्हाला जाणीव झाली नाही का? कधीतरी मराठ्यांची भावना समजून घ्या. परतफेड करायची वेळ आली आहे. ओबीसीतून घेऊ नका म्हणतात. खालून घेऊ की वरून घेऊ?”, असा सवाल मनोज जरांगे यांनी केला.
“मी उल्टा औलादीचा नाही, ते पाहुणे आहेत का? भुजबळ साहेबांवर चार दिवस झाले मी बोलत नाही. त्यांनी आरक्षणाला विरोध केला नाही, असं म्हटलं म्हणून नाव सुद्धा घेतलं नाही. तुम्ही विरोध केला तर मग आपला दणका अवघड असतो. मग सुट्टी नाही. मी जाहीर सांगतो, ओबीसी नेते आणि सगळ्या पक्षांच्या नेत्यांना सांगतो. मी मराठ्यांचा द्वेष करत नाही, मराठ्यांना आरक्षण द्यायचं म्हणून लढायला तयार आहे, असे सांगा. तुमच्यात मराठ्यांच्या बद्दल द्वेष का भरलाय? हे सांगायला तयार नाही”, असं जरांगे यावेळी म्हणाले.
“मराठ्यांच्या मुलांच्या ताटात विष कालवू नका. मराठा नाव घेतलं की ते लगेच विरोध करतात. ओबीसीत मराठा समाज आला तर कमी होईल. ग्रामीण भागात मराठा आणि ओबीसी एकत्र आहे. फक्त नेतेच विरोध करतात. त्यांचे आणि आपले पण धडाचे नाहीत. हे खोट बोलून ओबीसी बांधवांना वेड्यात काढत आहे. मराठा सगळा ओबीसी आरक्षणात गेले, फक्त आम्हीच राहिलो. दिलं 14 टक्के, खातो 30 टक्के, किती खातो?”, असा सवाल जरांगे यांनी केला.
“सरकारने आता मराठ्यांना आरक्षण द्यायचं. वळवळ करायची नाही. एक महिन्याचा वेळ दिला होता, 10 दिवस बोनस दिले. 14 तारखेला एकाने घरी राहायचं नाही. सगळ्यांनी आंतरवलीत यायचे. तुमच्यामुळे माझ्या समाजाचे कल्याण होईल. आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही. मेलो तरी मागे हटणार नाही. सरकारला विनंती. राज्यात दुष्काळ पडलाय. त्यांना वाऱ्यावर सोडू नका. आपल्यात एकजूट आहे फुटू देऊ नका”, असं आवाहन जरांगे पाटील यांनी यावेळी केलं.