नाशिकः नाशिककरांसाठी (Nashik) एक अतिशय महत्त्वाची बातमी. तुम्ही घरातून बाहेर पडण्यापूर्वीच वाचा. कारण त्यामुळे तुमचा एखादा फेरा वाचू शकतो. होय, नाशिकमधील वाहतूक (Traffic) मार्गात बदल करण्याचा निर्णय शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून घेण्यात आला आहे. सध्या मुस्लिम बांधवांचे पवित्र रमजान पर्व सुरू आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून, जुन्या नाशिकमधील अनेक मार्गाची वाहतूक इतर ठिकाणाहून वळवली आहे. फाळके रोड, शहीद अब्दुल हमीद चौक, दूध बाजार, भद्रकाली, चौक मंडई या भागात सायंकाळी खरेदीसाठी मुस्लिम बांधवांची मोठी गर्दी होते. यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ते ध्यानात घेता पोलीस (Police) आयुक्त दीपक पांडेय यांनी वाहतूक मार्गात बदल करण्याचे आदेश दिले आहेत. रमजान पर्व संपेपर्यंत हा बदल लागू राहणार असल्याचे समजते. शिवाय काही मार्गावर प्रवेश पूर्णतः बंद ठेवण्यात आला आहे. येत्या 3 मे पर्यंत दुपारी 4 ते रात्री 9 पर्यंत हा निर्णय लागू असणार असल्याचे कळवण्यात आले आहे.
पोलिसांच्या सूचनेनुसार, बादशाही कॉर्नरकडून भद्रकालीबाजारमार्गे दूध बाजाराकडे जाणारी वाहने आता टॅक्सी स्टँड येथून पिंपळ चौकमार्गे त्र्यंबक पोलीस चौकी व गाडगे महाराज पुतळ्याकडून मार्गस्थ होणार आहेत. मौलाबाबा दर्ग्याकडून जाणारी वाहने आता फाळके रोड येथून सारडा सर्कल मार्गे गंजमाळ, खडकाळी सिग्नलमार्गे मार्गस्थ होणार आहेत. तर महात्मा फुले चौकाकडून चौक मंडईकडे जाणारी वाहने आता द्वारका सर्कलवरून पुढे मार्गस्थ होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
अब्दुल हमीद चौक (दूध बाजार) ते फाळके रोड, चौक मंडई, ते बागवानपुरा (महात्मा फुले पोलीस चौकी) या मार्गावर सायंकाळी वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमन दलाचे बंब यांनाही हे निर्णय लागू करण्यात आले आहे. सर्वांनी पवित्र रमजान पर्व संपेपर्यंत या नियमांचे पालन करावे, असे आवाहन शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून नाशिककरांना करण्यात आले आहे.