नाशिक : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्यानंतर नाशिकमध्ये त्यांच्याविरोधात पहिला गुन्हा नोंद झाला आणि थेट अटकेचा आदेश निघाला. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट नाशिक पोलीस आयुक्तांना सूचक इशारा देत ते छत्रपती आहेत का? असा सवाल केला. यावर आता नाशिकचे पोलीस आयुक्त दीपककुमार यांनी प्रत्युत्तर दिलंय. माजी मुख्यमंत्री खूप सुज्ञान आहेत. त्यांचा कायद्याचा अभ्यास आहे. त्यांना माझं चॅलेंज नाही. माझंही थोडं ज्ञान आहे त्यानुसारच मी आदेश काढला, असं मत दीपककुमार यांनी व्यक्त केलं.
दीपक कुमार म्हणाले, “माजी मुख्यमंत्री साहेब ते खूप सुज्ञान आहेत, त्यांचा कायद्याचा अभ्यास आहे, त्यांना काही चॅलेंज नाही. माझं थोडं ज्ञान आहे, माझी शिकवण आहे, त्यानुसार आदेश काढला, तर तो चुकीचा असेल, संविधानाच्या 236, 237 खाली न्यायालयात जाऊन क्रॉस करु शकतात. मी माझ्या आदेशावर ठाम आहे, न्यायसंगत आहे. मात्र काल राणे साहेबांना जामीन मंजूर झाला, साहेबांनाी लिहून दिलं आहे अशी पुनरावृत्ती होणार नाही, म्हणून अटक करण्याचा अर्थ नाही, त्यामुळे मंत्रिमहोदयांना नोटीस देऊन पूर्तता केली.”
“प्रोटोकॉलनुसार, मंत्रिमहोदयांशी आदरपूर्वक वागलं पाहिजे, शिस्त पाळली पाहिजे, ते पाळण्यात आलं. कोणतीही हयगय झालेली नाही. मंत्रिमहोदयांचा पूर्ण आदर सन्मान झाला, यापुढेही करु,” असंही दीपककुमार यांनी नमूद केलं.
पोलीस आयुक्त दीपककुमार म्हणाले, “नारायण राणे यांना अटक करण्याची कॉम्पिटिशन नव्हती. दोन संवैधानिक व्यक्तींमध्ये वाद झाला होता. या गोष्टीची पुनरावृत्ती होऊ नये, समाजात तेढ निर्माण होऊ नये यासाठी अटकेचे आदेश दिले होते. साहेबांनी कोर्टात लिहून दिलं आहे, पुनरावृत्ती होणार नाही. त्यानंतर अटकेची कारवाई बदलली. आमच्या पथकाने योग्य कारवाई केली, त्यावर मी समाधानी आहे.”
“नारायण राणेंना जामीन हा महाड कोर्टाकडून त्या खटल्यात मिळाला आहे. आमच्या केसमध्ये अजून अटकेची कारवाई झालेली नाही. आम्ही फक्त 2 सप्टेंबरला हजर राहून तपासात सहकार्य करण्याची विनंती केली आहे. त्यांनी ते स्वीकारलं आहे. मी या कारवाईबाबत समाधानी आहे,” असंही पोलीस आयुक्तांनी नमूद केलं.
दीपककुमार म्हणाले, “सायबर पोलीस स्टेशन नाशिकमध्ये गुन्हा नोंद झाला होता. त्यासंदर्भात साहेबांना रत्नागिरी संगमेश्वरमध्ये अटक झाली. त्यानंतर रायगड पोलीस ताब्यात घेऊन गेले. महाड येथे गुन्हा दाखल झाल्याने कोर्टात दाखल केले. सुनावणी काल उशिरापर्यंत चालली. न्यायालयाने जामीन दिला. त्यानंतर नाशिक पोलिसांनी अटकेची भूमिका बदलली.”
“केंद्रीय मंत्री साहेबांना 2 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजेपूर्वी पोलिसात येऊन जबाब नोंदवण्याची विनंती केली आहे. ती त्यांनी स्वीकारली आहे. माननीय मंत्रिमहोदय 2 सप्टेंबरला येतील आणि तपास प्रक्रियेत सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.
आयुक्त पुढे म्हणाले, “ते कधीही येऊ शकतात. त्याबाबत त्यांना मूभा आहे. सहकार्याची भूमिका अपेक्षित आहे. ते सहकार्य करत आहेत, आदर करतो, स्वागत करतो. सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला आहे. त्याच्या संदर्भात जे कोणी व्यक्ती आहेत, त्यांचा जबाब नोंदवला जातो. पुरावे सादर करण्यासाठी मुभा दिली जाते. मंत्रिमहोदयांना 2 सप्टेंबरची तारीख दिली आहे. ती त्यांनी स्वीकारली आहे. साहेब तुम्ही या आणि तुमचा जबाब नोंदवा.”
“समजपत्र दिलं आहे, सहकार्य न झाल्यास काय कारवाई होऊ शकते हे नोटीसमध्ये सांगितलंय. त्यावर त्यांनी स्वाक्षरीही केली आहे. सध्याची जी परिस्थिती आहे त्यावर समाधानी आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.
Nashik CP Deepak Kumar answer Devendra Fadnavis over criticism