शैलेश पुरोहित, इगतपुरीः नाते संबंधांना काळीमा फासण्याचे प्रकार केव्हाच घडलेत. मात्र, आता कुटुंबात साधी माणुसकीही उरली नसल्याचे समोर येत आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यातील शेणवड बुद्रुक येथे एका 28 वर्षीय विवाहित चुलतीवर चक्क पुतण्याने बलात्कार (Rape) केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पीडित महिलेने घोटी पोलीस (Police) ठाण्यात पुतण्या विरोधात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी संशयित पुतण्या अवघ्या 22 वर्षांचा असून, त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. किरण वसंत दिवटे असे त्याचे नाव आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. फिर्यादीमध्ये नमूद अधिक माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यातील शेणवड बुद्रुक येथील विवाहित महिला मांजरगाव येथे विवाहाच्या पुऱ्या करण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिला खोटे कारण सांगून संशयित पुतण्याने बाहेर नेले आणि बलात्कार केला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपासाला सुरुवात केली आहे.
नेमके प्रकरण काय?
घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यातील शेणवड बुद्रुक येथील विवाहित महिला मांजरगाव येथे विवाहाच्या पुऱ्या करण्यासाठी गेली होती. ही संधी साधून गुरुवारी रात्री 11 च्या सुमारास किरण वसंत दिवटे हा पुतण्या (रा. शेणवड बुद्रुक, ता. इगतपुरी) घराबाहेर गेलेल्या पीडित चुलतीकडे गेला. पीडित चुलतीला त्याने सांगितले की, नाना (पीडित महिलेचे पती) दारू पिऊन पडले आहेत. चल तुला दाखवतो म्हणून सोबत यायला लावले. महिलेने पुतण्यावर विश्वास ठेवला. मात्र, इथेच ती जाळ्यात अडकली.
तोंड दाबून बलात्कार
पुतण्याने आपल्या काकूला एका नाल्यासारख्या खड्डयाजवळ नेले. तिथे मारहाण करून तोंड दाबले. यावेळी तिच्यावर बलात्कार केला. कोणाला सांगितले, तर जीवे ठार मारून टाकण्याची धमकी दिली. पीडित महिलेने पतीला सर्व घटना सांगितल्यानंतर घोटी पोलीस ठाण्यात हजर होऊन महिलेने याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार संशयित आरोपी पुतण्या किरण वसंत दिवटे याला पोलिसांनी अटक केली आहे .
गुन्हा केला कबूल
संशयित पुतण्याने पोलीस चौकशीत गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. त्याच्यावर भारतीय दंडविधान संहितेचे कलम 376, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. घोटीचे पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार केदारे, गायकवाड आदींनी कसून तपास सुरू केला आहे.